सिंह, अस्वलासह कोल्ह्यांची जोडी येणार; सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थ उद्यानात

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील 3 वाघ कर्नाटकच्या प्राणिसंग्रहालयाला देण्यात येणार आहेत, तर तेथील सिंह, अस्वल आणि कोल्ह्यांची जोडी मनपाच्या प्राणिसंग्रहालयात आणण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या 11 ऑगस्ट रोजी शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सिद्धार्थ उद्यानात पाहणी केली असून, गणेशोत्सवानंतर म्हणजे सप्टेंबर महिन्यात प्राण्यांची देवाण-घेवाणीची प्रक्रिया केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मनपाचे सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाचे वातावरण हे वाघांच्या जन्मासाङ्गी पोषक ठरत आहे. त्यामुळे मागील काही वर्षात सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात वाघांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. उद्यानातील पिंजऱ्यांची जागा ही वाघांना फिरण्यासाठी कमी पडत असल्याने व सध्या उद्यानात तेवढ्या क्षमतेचे अतिरिक्त पिंजरे उपलब्ध नसल्याने नर-मादी वाघांना वेगवेगळे ठेवण्यात येत आहे. या प्राणिसंग्रहालयात दररोज हजारो पर्यटक व नागरिक वन्य प्राणी पाहण्यासाठी येतात. या उद्यानातील प्राणिसंग्रहालयात यापूर्वी सिंहाच्या जोडीसह वाघ, बिबट्या, अस्वल, हत्ती, मगर, हरिण, काळविट, सांबर, निलगाय, शहामृग, लांडगा, सायाळ, लाल माकड असे विविध प्राणी उपलब्ध होते. मात्र, 20 वर्षांपूर्वी उद्यानातील शेवटची सिंहिण मरण पावली. तेव्हापासून उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयाला सिंहाची जोडी मिळू शकली नाही. सिंह नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. प्राणिसंग्रहालयात सध्या 7 पिवळ्या पट्ट्याचे वाघ आणि 5 पांढऱ्या पट्ट्याचे वाघ आहेत. दरम्यान, येत्या 11 ऑगस्ट रोजी कर्नाटकच्या उद्यानाचे अधिकारी शहरात येणार आहेत. ते सिद्धार्थ उद्यानातील वाघांची पाहणी करणार असून त्यानंतर मनपाचे पथक शिवमोग्गा येथे जाऊन प्राण्यांची पाहणी करणार आहे. त्यानंतर गणेशोत्सवानंतर प्राण्यांची देवाण-घेवाणीची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.