68 लिंगांच्या तैलाभिषेकाने सिद्धरामेश्वर महायात्रेला प्रारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महायात्रेला आज 68 लिंगांच्या तैलाभिषेकाने प्रारंभ झाला. प्रथमच तैलाभिषेकावेळी नंदीध्वजाऐवजी योगदंडाच्या साक्षीने तैलाभिषेक करण्यात आला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता. प्रतिवर्षी नंदीध्वज व योगदंडाच्या साक्षीने निघणारी भव्य मिरवणूक यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आली. प्रमुख पुजारी व मानकऱयांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांना तैलाभिषेकाने प्रारंभ होतो. सकाळी बाळीवेस येथील हिरेहब्बू यांच्या मठात मानाच्या दोन नंदीध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले. नंदीध्वज तिथेच ठेवून प्रमुख पुजारी हिरेहब्बू व मानकरी हे सजविलेल्या रथात पालखी ठेवून सिद्धेश्वर मंदिरात आले. रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी लांबूनच दर्शन घेतले. सिद्धेश्वर मंदिरात पूजाविधी झाल्यानंतर 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी मुख्य पुजारी हिरेहब्बू व मानकऱयांनी रथातून शहराच्या विविध ठिकाणी असलेल्या लिंगांना तैलाभिषेक केले. सायंकाळच्या सुमारास पुन्हा हिरेहब्बू मठात परतले. गर्दी करण्यास सक्त मनाई करण्यात आल्याने भाविकही योगदंडाचे व पालखीचे लांबूनच दर्शन घेत होते.

विजापूर वेस मुस्लिम युवक मंडळाच्या वतीने पुष्पवृष्टी करून योगदंडाचे स्वागत करण्यात आले. 68 लिंगांतील पहिले मंदिर परिसरातील अमृत लिंगाजवळ तैलाभिषेक करून देशमुखांना विडा देण्यात आला. प्रतिवर्षी या तैलाभिषेक सोहळ्यास योगदंडाबरोबरच मानाचे सात नंदीध्वज असतात; परंतु प्रशासनाने भाविकांसह काढण्यात येणाऱया या मिरवणुकीत परवानगी नाकारली आहे. शहरात आज एकदा बोला भक्त लिंग हर्र बोला हर्र हा गजर सुरू होता. सर्वत्र मंगलमय वातावरण होते. यंदाच्या वर्षी मिरवणुकीच्या मार्गावर बैलगाडीऐवजी ट्रक्टरचा वापर करण्यात आला. मिरवणुकीच्या मार्गावर व प्रमुख चौकात भव्य असे रांगोळीच्या पायघडय़ा घालण्यात येत होत्या, वाद्ये असत; परंतु यंदाच्या वर्षी या सर्वांना फाटा देत आजचा तैलाभिषेक सोहळा पार पडला. यावेळी मोजक्याच लोकांना प्रवेश देण्यात आला होता.

आज अक्षता सोहळा

बुधवारी याच पद्धतीने नंदीध्वजाचे मानकऱयाच्या घरी पूजन करण्यात येईल व सजविलेल्या वाहनातून सातही नंदीध्वज मंदिर परिसरातील पेम्मती कट्टय़ाजवळ आणण्यात येणार आहे. तिथे प्रमुख पुजारी हिरेहब्बू मानकऱयांच्या उपस्थितीत अक्षता सोहळा संपन्न होईल. अक्षता सोहळा संपल्यानंतर पुन्हा नंदीध्वज मार्गस्थ होईल.