
नववर्षाच्या सुरुवातीला लाखो मुंबईकर देवदर्शनासाठी मंदिरांमध्ये हजेरी लावतात. प्रभादेवीतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात भक्तीचा जनसागर उसळतो. या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षाप्रमाणे यंदा सिद्धिविनायक मंदिर नववर्षानिमित्त सज्ज झाले आहे. गणेशभक्तांच्या सोयीसाठी मंदिर 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 3.15 वाजल्यापासून बाप्पाच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
गणेशभक्तांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सिद्धिविनायक मंदिर न्यासने बाप्पाच्या दर्शनाचे विशेष नियोजन केले आहे. त्यानुसार पहाटेपासून मंदिर दर्शनरांगेसाठी खुले करण्यात येणार आहे. पुरुष आणि स्त्रियांच्या रांगेकरिता मंडप उभारण्यात येणार आहे. मुखदर्शन आणि दुरून दर्शनाची व्यवस्था एस.के. बोले मार्गावरील मंदिर प्रवेशद्वार क्र. 1 मधून केली जाणार आहे. भक्तांनी पॅमेरा, लॅपटॉप अशा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणू नयेत, असे आवाहन मंदिर न्यासाने केले आहे.
दर्शन व्यवस्था
आशिर्वचन पूजा रांग
सिद्धी प्रवेशद्वार येथील सुरक्षा भिंत साने गुरुजी उद्यान येथील मंडप प्रवेशद्वार क्र. 3 – गाभारा
गाभाऱयातून दर्शनासाठी महिलांची रांग
राजे संभाजी उद्यान प्रवेशद्वार (रवींद्र नाटय़ मंदिर शेजारी) मंडप प्रवेशद्वार क्र. 6 – प्रतीक्षालय इमारत प्रांगणातील रेलिंग प्रवेशद्वार क्र. 7 गाभारा
गाभाऱयातून दर्शनासाठी सर्वसामान्य रांग
राजे संभाजी उद्यान प्रवेशद्वार (रवींद्र नाटय़ मंदिर शेजारी) मंडप क्र. 4 गाभारा.
मुखदर्शन/दुरून दर्शन रांग
एस.के. बोले मार्ग, आगर बाजार, हरदेव कृपा दुकान, सिद्धी प्रवेशद्वार मंदिर प्रवेशद्वार क्र. 7
ज्येष्ठ नागरिक/दिव्यांग/गर्भवती
रिद्धी प्रवेशद्वारातून (काकासाहेब गाडगीळ मार्ग) प्रवेशद्वार क्र. 5 गाभारा
दादर स्थानक येथून विनामूल्य बससेवा
गणेशभक्तांच्या सोयीसाठी दादर येथून विनामूल्य बससेवा उपलब्ध केली जाणार आहे. दादर ते रवींद्र नाटय़ मंदिर या मार्गावर एकूण 20 खासगी वातानुकूलित बसची (20 आसनी) व्यवस्था करण्यात येणार आहे. भक्तांना दादरच्या कबूतरखाना परिसरातून बससेवेचा लाभ घेता येईल, असे मंदिर न्यासाने कळवले आहे.





























































