
व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे युजर्स आता नव्या पर्यायाच्या शोधात आहेत. त्यामुळे सिग्नल अॅपने हिंदुस्थानी मार्केटवर लक्ष केंद्रीत केले आहे. सिग्नलचे सह-संस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी हे मान्य केले आहे. हिंदुस्थानी मार्केट एवढे मोठे आहे की जर तुम्ही हिंदुस्थानासाठी काही निर्माण करत असाल तर ते जगासाठी निर्माण करत असता असे वक्तव्य ब्रायन अॅक्टन यांनी केले आहे.
हिंदुस्थानात व्हॉट्सअॅपचे 40 कोटी युजर्स आहेत. ही एक मोठी बाजारपेठ आहे. हिंदुस्थानी लोकांना सिग्नलचे युजर्स बनवण्यास आम्ही उत्सुक आहोत. यूजर्सनी आपल्या डिजिटल प्रायव्हसी सोबत कोणतीही तडजोड करू नये यासाठी आम्ही त्यांना एक पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत, असे अॅक्टन म्हणाले.
सिग्नलचे सह-संस्थापक असलेले ब्रायन अॅक्टन हे व्हॉट्सअॅपचेदेखील संस्थापक होते. ब्रायन अॅक्टन आणि जॅन कोम यांनी 2014 साली व्हॉट्सअॅपची मालकी फेसबुकला विकली. त्यानंतर 2017 साली फेसबुकशी काही मतभेद झाल्यानंतर त्यांनी कंपनी सोडली होती.
हिंदीसह 12 भाषांमध्ये अॅप
हिंदुस्थानातील विस्ताराबद्दल ब्रायन अॅक्टन म्हणाले, हिंदुस्थान हा विविध संस्कृती असणारा देश आहे. त्यामुळे सिग्नल या ठिकाणी हिंदीसह 12 भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. माझे हिंदुस्थानातील सहकारी इथल्या बाजारपेठेविषयी मला बरीच उपयुक्त माहिती देतात. त्यामुळे प्रोडक्टबद्दल नवनवीन कल्पना सुचत आहेत. हिंदुस्थानासाठी काही निर्माण करणे म्हणजे जगासाठी निर्माण करणे.
ताजमहल बघायचाय
मी हिंदुस्थानला दोनवेळा भेट दिली आहे. बंगळुरू, मुंबई, दिल्ली आणि अन्य ठिकाणी गेलो होतो. मला ताजमहलला भेट द्यायची आहे. तसेच पुन्हा मुंबई आणि बंगळुरूला पण जायचे आहे, अशी इच्छा अॅक्टन यांनी व्यक्त केली.
सिग्नलला सात दिवसांत एक कोटी 78 लाख डाऊनलोड
देशभरात सिग्नल अॅपची व्रेझ वाढत आहे. गेल्या सात दिवसांत एक कोटी 78 लाख युजर्सनी सिग्नल डाऊनलोड केले आहे. याच कालावधी व्हॉट्सअॅपच्या डाऊनलोडचे प्रमाण घटलेले दिसत आहे. व्हॉट्सअॅपला एक कोटी डाऊनलोड मिळाले. म्हणजे सिग्नलच्या तुलनेत 17 टक्के घट दिसत आहे.
वर्षभरात मोबाईल अॅपचे 218 अब्ज डाऊनलोड
कोरोना संकटातही 2020 चे मोबाईल अॅप मार्पेट जोरात होते. मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याचे प्रमाण वर्षभरात 7 टक्क्यांनी वाढून 218 अब्ज डाऊनलोड इतके झाले आहे. तसेच ग्राहकांनी अॅप स्टोअरवर खर्च करण्याचे प्रमाण वर्षाकाठी 20 टक्क्यांनी वाढले आहे. गुगल पे, अॅपलचे अॅप स्टोअर यासारख्या अॅप स्टोअरवर ग्राहकांनी गेल्या वर्षी 143 अब्ज डॉलर खर्च केले आहेत.























































