
हिंदू समाजातील विवाहित महिलेला जर तिच्या आई किंवा वडिलांकडून वारसा हक्काने मालमत्ता मिळाली असेल आणि दुर्दैवाने तिचा मृत्यू अपत्यहीन किंवा कोणतीही इच्छापत्र न करता झाला असेल तर त्या मालमत्तेवर पती किंवा सासरच्या कोणत्याही व्यक्तीचा कायदेशीर हक्क राहणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायाधीश तारलाडा राजशेखर यांनी हा निकाल दिला.
एका महिलेने 2002 मध्ये आपली मालमत्ता पहिल्या नातीला भेट दिली होती. जिचा 2005 मध्ये अपत्यहीन मृत्यू झाला. त्यानंतर आजीने जुनी भेट रद्द करून मालमत्ता दुसऱया नातीच्या नावावर इच्छापत्र करून केली. 2012 मध्ये आजीच्या निधनानंतर दुसऱया नातीने महसूल नोंदीमध्ये नाव देण्यासाठी अर्ज केला. परंतु, मृत नातीच्या पतीने याला आव्हान दिले. सहजिल्हाधिकाऱयाने आरडीओचा निर्णय फिरवत पतीच्या बाजूने म्युटेशनचे निर्देश दिले. सुरुवातीची गिफ्ट डीड रद्द करणे कायदेशीर वैध नव्हते, असे म्हटले. परंतु, हे प्रकरण आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आले असता न्यायालयाने म्हटले की, कोणतेही इच्छापत्र न करता झाला असेल तर त्या मालमत्तेवर पती किंवा सासरच्या मंडळींचा कायदेशीर हक्क राहत नाही.



























































