
सिल्लोड-सोयगाव तालुक्यांत ओला दुष्काळ जाहीर करावा, परतीच्या पावसामुळे शेतमालाचे पूर्ण नुकसान झाल्याने नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱयांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, शेतकऱयांना 100 टक्के पीक विमा मिळावा, शेतकऱयांना 2 रुपये दराने धान्य, तसेच जनावरांना दावणीवर चारा उपलब्ध करून द्यावा अशा विविध मागण्यांसाठी गुरुवारी शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढला. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. आमदार अब्दुल सत्तार व इतर पदाधिकारी बैलगाडीत होते तर अनेक शेतकऱयांनी नुकसान झालेला शेतमाल घेऊन ट्रक्टरवर होते. हजारो शेतकऱयांनी या मोर्चात सहभाग नोंदविला. कोंब फुटलेली मका, ज्वारी, सोयाबीन, बाजरीची कणसे घेऊन शेतकरी सहभागी झाले होते.
शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी
आज मातोश्रीवर अत्यंत महत्त्वाची बैठक होती. सिल्लोडचा मोर्चा नियोजित होता. त्यातच मतदारसंघात दोन शेतकऱयांनी आत्महत्या केल्याने या ओल्या दुष्काळाची दाहकता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितली. त्यांनी शिवसेनेची पहिली बांधिलकी शेतकऱयांसोबत आहे असे म्हणत आधी शेतकऱयांच्या प्रश्नाचे बघा असा आदेश दिल्याचे आमदार सत्तार यांनी सांगितले.


























































