
‘सिल्व्हर ओक’ हल्ला प्रकरणात आरोपी असलेल्या ऍड. जयश्री पाटील या अजूनही फरार आहेत. गावदेवी पोलीस जयश्री यांचा कसून शोध घेत आहेत.
7 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत जयश्री यांनी हल्ला करण्यासाठी भडकावले होते. त्यामुळे पोलीस आपल्यालाही पकडणार याची कुणकुण लगताच जयश्री पाटील या पसार झाल्या. त्यामुळे सोमवार आणि बुधवारी त्यांचे पती ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या कोर्टाची तारीख असतानाही जयश्री या दोन्ही दिवशी कोर्टात आल्या नव्हत्या. अखेर त्यांचेही नाव गुह्यात घेण्यात आले.
गुजर, गावंडे पोलिसांच्या ताब्यात
अकोल्यात ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी ऍड. जयश्री पाटील तसेच अजयकुमार गुजर आणि प्रफुल्ल गावंडे यांच्यावर अकोट शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर एसटी कर्मचाऱयांकडून प्रत्येकी 300 ते 400 रुपये गोळा करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. तब्बल 74 हजार कर्मचाऱयांना फसवल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे. इतकेच नाही तर त्यांनी न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी पैसे गोळा केल्याचादेखील त्यांच्यावर आरोप आहे. आज या प्रकरणातील आरोपी अजयकुमार गुजर आणि बसवाहक प्रफुल्ल गावंडे यांना अकोला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
























































