सोने-चांदीचा धमाका सुरुच; वायदे बाजार सुरू होताच चांदीने गाठला 4 लाखांचा टप्पा, सोनेही 2 लाखांजवळ पोहचले

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीच्या दरात तुफानी तेजी दिसत आहे. त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध लष्करी कारवाईची धमकी दिली आहे. तसेच ग्रीनलँडवर ताबा घेण्याचे मनसुबेही त्यांनी जाहीर केले आहेत. रशिया- युक्रेन युद्ध चार वर्षांपासून सुरू आहे. त्यातच आता अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणाची ठाम भूमिका आणि डॉलरचे अवमूल्यन या सर्व जागतिक घडामोडींचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर झाला आहे. त्यामुळे गुरुवारी वायदे बाजाराला सुरुवात होताच चांदीचे दर 4 टक्क्यांनी वाढले आणि त्यांनी 4 लाखांचा महत्त्वाचा आणि मोठा टप्पा पार केला. तर सोनेही आता 2 लाखांजवळ पोहचले आहे. हे त्यांचे आतापर्यंतचे उच्चांक आहेत.

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने बुधवारी बाजाराच्या अपेक्षेनुसार व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले आहे. फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल म्हणाले की, डिसेंबरमधील महागाई अजूनही मध्यवर्ती बँकेच्या २% या लक्ष्यापेक्षा खूप जास्त असण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आणि जागतिक अस्थिरतेचा परिणाम गुरुवारी सोने चांदीच्या दरावर दिसून आला. गुरुवारी चांदीच्या किमती ४ लाखांच्या पुढे गेल्या. वायेद बाजार म्हणजेच MCX वर, चांदी ४% नी वाढून ₹४,००,७८० वर पोहोचली. तर 10 वाजण्याच्या सुमारास चांदी 19,630 रुपयांनी वाढून ती 4,04,998 रुपयांवर पोहचली होती. तर सोन्याच्या दरात 15,943 रुपयांनी वाढून 1,93,096 रुपयांवर पोहचला होता.