
कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे राजेंद्र बळीराम गावडे (52) या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाची प्रकृती गंभीर असताना प्राथमिक तपासणीनंतर घरी पाठवले. रुग्ण घरी पोहोचताच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रुग्णालयात घेराव घातला. जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वागदे येथील राजेंद्र गावडे हे गुरुवारी 6 नोव्हेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आले होते. त्यांच्या गंभीर अवस्थेकडे दुर्लक्ष करत त्यांना उपचार देऊन घरी पाठविण्यात आले. मात्र, प्रकृती बरी नसल्याने पुन्हा शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी ते रुग्णालयात आले. तपासणीनंतर त्यांचा बीपी 50 तर प्लेटलेट 36000 असल्याचे कळले. रुग्णाची स्थिती गंभीर असताना देखील त्या कंत्राटी महिला डॉक्टरने रुग्णाला घरी पाठवले. घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच राजेंद्र गावडे यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर वागदे येथील ग्रामस्थ, सरपंच, माजी नगरसेवक, शहराध्यक्ष, यांच्यासह ग्रामस्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी वैद्यकीय अधिक्षक आणि महिला डॉक्टरना घेराव घालून जाब विचारला. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सुबोध इंगवले हे चर्चेसाठी आले. त्यावेळी ग्रामस्थांनी दोषी डॉक्टरांवर कारवाई करा, तसेच गावडे कुटुंबियांनी आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली. डॉ. इंगवले यांनी घटनेची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना दिली. यानंतर डॉ.पाटील रुग्णालयात दाखल झाले. ग्रामस्थांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.
































































