
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांसह संतप्त ग्रामस्थांनी शहरातील खासगी रूग्णालयात तोडफोड केली. डॉक्टरांच्या केबिनलाही घेराव घातला. नातेवाईकांनी तरुणीचा मृतदेह रूग्णालयाच्या दारातत ठेवला आहे. या घटनेमुळे रूग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला.
मयत तरुणीला उपचारासाठी कणकवली येथील खासगी रूग्णालयात आणण्यात आले होते. या रुग्णालयात तरुणीच्या डोक्यातील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रेक्रियेनंतर रक्तस्त्राव थांबत नसल्याने तिला कोल्हापूर येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. कणकवलीतील खासगी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. योग्य उपचार करणे शक्य नव्हते तर रूग्णाला आधीच दुसऱ्या रूग्णालयात पाठवायला हवे होते. तरुणीची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला कोल्हापूरला नेण्यास सांगण्यात आले. यात तरुणीचा हकनाक बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना रविवारी पहाटेच्या सुमारास तरुणीचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी तरुणीच्या मृतदेहासह कणकवलीतील खासगी रुग्णालय गाठले. तरुणीचा मृतदेह रुग्णालयाच्या दरात ठेवून तोडफोड केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कणकवली पोलिसांनी सदर खाजगी रुग्णालय गाठले. पोलीस ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत.

























































