‘सिंदूर’ पूल वाहतुकीसाठी खुला, दक्षिण मुंबईचा प्रवास सुखकर; कर्नाक ब्रीजवरून वाहतूक सुरू

दक्षिण मुंबईमध्ये पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा मस्जीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील पालिकेचा कर्नाक ब्रीज आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला. भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी या पुलाचे ‘नामकरण’ सिंदूर केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ब्रीजचे लोकार्पण झाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा पूल अनेक वर्षे ‘कर्नाक पूल’ या नावाने ओळखला जात होता. तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर कर्नाक यांचे नाव पुलाला दिले होते. परंतु, इतिहासात नोंद असणारे दाखले पाहता, विशेषतः प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या साताऱयाच्या इतिहासात उल्लेख आहे की, गव्हर्नर कर्नाक यांच्या काळात छत्रपती प्रतापसिंह महाराज, मुधोजी राजे यांच्यावर अन्याय करण्यात आला. त्यामुळे अशा काळ्या इतिहासाशी संबंधित नामकरण हटविणे गरजेचे आहे.

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची लोकार्पणाला दांडी

निधी वाटप, श्रेयवाद आणि मानापमानावरून सध्या महायुती सरकारमध्ये छुपे वाद सुरू असून एकमेकांना कमीपणा दाखवण्याचे प्रकार सुरू आहेत. असे असताना आज झालेल्या महत्त्वाच्या पूल लोकार्पण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक कार्यकमाला दांडी मारल्याचे बोलले जात आहे.