निसर्गाची आराधना व पंचमहाभूतांवर विश्वास – अजित परब

173

गायक अजित परब निसर्गाची आराधना करतो. पंचमहाभूतांवर विश्वास ठेवतो.

> आपलं आवडतं दैवत? – मूर्तीपेक्षा तत्त्व म्हणून पाहायला मला जास्त आवडतं. कारण कुठल्याही देवापेक्षा भक्ती महत्त्वाची. चराचरातील तत्त्व, गुण हेच त्यातील दैवत आहे, असं मी मानतो.

> त्याचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं? –पंचमहाभूतांच्या मूर्तींची पूजा करतो. तरीही आपण समुद्र, हवा, नदी, आकाश, माती अस्वच्छ केलीय. या सगळ्याची वाट लावून आपण यापासून तयार केलेल्या मूर्तीचीच पूजा करतोय. हे आपल्याला कधी कळणार?

> संकटात तुम्हाला तत्त्वाची कशी मदत होते, असं वाटतं? – संकटात एकच गोष्ट तुम्हाला मदत करू शकते. ती म्हणजे फक्त तुम्ही स्वतः. यामध्ये गुरूचे, आईवडिलांचे संस्कार याच गोष्टी आपल्याला पुढे नेत असतात.

> कला आणि भक्तीची सांगड कशी घालता? – जिथे कला आहे तिथे भक्तीच आहे. एखादी कला शिकायला सुरुवात केली की कळतं, याचं शिक्षण आयुष्यभर सुरूच राहणार आहे. त्यामुळे तिथे भक्ती नसेल तर ते पूर्ण होऊ शकत नाही.

> तुमच्यातली कला साकारण्याकरिता त्याची कशी मदत होते? – विचारातून, सादरीकरणातून कलेचं प्रतिबिंब दिसत असतं. कला व्यक्तिमत्त्वापेक्षा वेगळी नसते.

> आवडत्या तत्त्वाला प्रार्थना केल्यावर यश मिळालंय, असा प्रसंग? – असा प्रसंग नाही, पण हे नक्की माहीत असतं की, यातून मला स्वतःला बाहेर पडायचंय. अनुभव हा फार मोठा गुरू आहे. जो तुम्हाला प्रत्येक वेळी शिकवत असतो.

> निसर्गाचं कोणतं स्वरूप आवडतं? – वन्यजीवांचा मी चाहता आहे. सगळे ऋतु, नद्या, डोंगर अशी प्रत्येक गोष्ट नैसर्गिक भावते.

> त्याच्यापाशी काय मागता? – माणसाने खरं तर आता द्यायची वेळ आहे. पुढच्या पिढीला निसर्गाचं आपण काय केलंय आणि त्याचा काय परिणाम होतोय, होणार आहे. निसर्ग संवर्धनाबाबत लोकांना जागरुक करायला हवं.

> त्याची नियमित उपासना कशी करता? – वेळ मिळेल तसा रियाज करतो. संगीतात 20 टक्के रियाज आणि 80 टक्के संगीत ऐकणं यानुसार जगातलं वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकणं, त्याचं मनन करणं हे सतत चालूच असतं. संगीतकार, गायक म्हणून सतत नवीन ऐकणं महत्त्वाचं.

आपली प्रतिक्रिया द्या