निसर्गातून देवत्वाची अनुभूती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गायक त्यागराज खाडिलकर   

भवतीच्या पर्यावरणात त्यांना देव सापडतो. आपल्या संगतीतून ते निसर्गसाधना करतात.

आपलं आवडतं दैवत? : निसर्ग

त्याचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं? : पर्यावरणाचं रक्षण आणि त्याचा कमीतकमी विध्वंस करून करायला आवडतं.

कला आणि भक्तीची सांगड कशी घालता? : मुळात निसर्ग हे दैवत असून त्यामध्ये संगीत आहे. झुळझुळणारा झरा, गुंजारव करणारे भुंगे या सगळ्यात शिवाय शांततेतही संगीत आहे.

तुमच्यातली कला साकारण्याकरिता त्याची कशी मदत होते? : पहाटेच्या वेळी रियाज करायला बसतो. तेव्हा इतकं प्रसन्न वाटतं की, मनापासून गाण्याची प्रेरणा मिळते.

आवडत्या दैवताला प्रार्थना केल्यावर यश मिळालंय असा प्रसंग? : गोव्यात, कोकणात संगीत महोत्सव होतात. तेव्हा समुद्राची गाज ऐकून किंवा त्याच्या दर्शनानेच उत्साह येतो.

त्याच्यावर रागावता का? : उन्हाळा, दुष्काळ, भरती, त्सुनामी असं त्याचं रौद्र रूप दाखवून त्याची नाराजी व्यक्त करतो.

निसर्गाचं कोणतं स्वरूप आवडते? : अगदी जवळचं वाटणारं रूप म्हणजे अथांग समुद्र. अविरत लाटा त्याच्यावर तरंग उमटवतात. त्याचा हा खेळ अखंड सुरू असतो.

त्याच्यापाशी काय मागता? : आम्ही सगळे भक्त तुझी काळजी घेऊच, पण तूसुद्धा न रागावता सृष्टीचं चक्र व्यवस्थित सांभाळ.

त्याच्या आवडीचा नैवेद्य? : झाडांना खतपाणी घालणं,  समुद्रकिनार्‍याचं संवर्धन करणं, परिसरात कचरा न टाकण्याविषयी लोकांना सांगतो. लोकांनी टाकलेला कचरा उचलतो.

त्याची नियमित उपासना कशी करता? : निसर्गाने मला संगीताचं देणं दिलंय. ऋतुचक्रानुसार ठरल्याप्रमाणे रागांची आळवणी करणे हीच त्या निसर्गाची पूजा.