सिंहस्थासाठी नव्या 12 घाटांची उभारणी करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये नवीन 10, तर त्र्यंबकेश्वर येथे 2 घाटांची उभारणी करण्यात येणार आहे. महानगरपालिका, राज्य पायाभूत विकास महामंडळ व जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मार्च 2027 पर्यंत ही कामे पूर्ण होतील, अशी माहिती कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. सिंहस्थात लाखो भाविक स्नानासाठी येतात. होणारी गर्दी विचारात घेता नाशिक शहरातील सध्या असलेल्या 10 घाटांव्यतिरिक्त आणखी 10 घाट उभारण्याचे नियोजन आहे. 9 किलोमीटर लांबीच्या गोदावरी नदीवर कपिला संगम, नंदिनी संगम, टाकळी संगम व पूल, नांदूर दसक डावा व उजवा काठ, ओढा, सोमेश्वर, नवशा गणपती व लक्ष्मीनारायण घाट येथे हे नवीन 3 हजार 451 मिटर लांबीचे घाट बांधण्यात येतील. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीच्या दोन्ही तटावर 3 हजार 140 मिटरपर्यंत घाटांची लांबी असेल. नाशिकसाठी 361 कोटी 26 लाख, तर त्र्यंबकेश्वर येथे 146 कोटी 10 लाख खर्च अपेक्षित आहे.