अक्षय शिंदेचा एन्काऊंटर पोलिसांना भोवणार, हायकोर्टाच्या दणक्यानंतर अखेर एसआयटी नोंदवणार गुन्हा

बदलापूर बाल अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर पोलिसांना चांगलाच भोवणार आहे. न्यायालयाने आदेश देऊनही याचा गुन्हा नोंदवला जात नव्हता. अखेर न्यायालयाने कान उपटल्यानंतर या एन्काउंटरचा गुन्हा येत्या शनिवारपर्यंत नोंदवला जाईल, अशी हमी विशेष तपास पथकाने (एसआयटी) बुधवारी उच्च न्यायालयात दिली.

एसआयटीचे प्रमुख सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांनी ही माहिती दिली. पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांच्यामार्फत हा गुन्हा नोंदवला जाईल, असे मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाला सांगितले. न्यायालयाने त्याची नोंद करून घेतली. या एन्काउंटरचा न्यायालयीन चौकशी अहवाल न्यायालयात सादर झाला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर या अहवालातील जबाब व अन्य कागदपत्रे एसआयटीने न्यायालयातून घ्यावीत. ही कागदपत्रे पोलीस आयुक्तांना द्यावीत, असे आदेशही खंडपीठाने दिले.

  • न्यायालयीन चौकशी अहवालातील जबाबांची प्रत मिळाल्यानंतर आम्ही गुन्हा नोंदवू किंवा यासाठी एका तक्रारदाराने पुढे यावे. कारण एसआयटीला याचा नव्याने तपास करायचा आहे, असा युक्तिवाद एसआयटीकडून मुख्य सरकारी वकील वेणेगावकर यांनी केला. त्यावर न्यायालय संतप्त झाले. कशाला तुम्हाला कोणी तक्रारदार हवा आहे. भररस्त्यात एखाद्याची गोळी झाडून हत्या झाल्यास तुम्ही स्वतःहून गुन्हा नोंदवताच ना, असे खंडपीठाने फटकारले.