बालसुधारगृहातून सहा मुली पळाल्या

तहसील कार्यालयाच्या जवळ असलेल्या महिला बालसुधारगृहातून 6 मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यापैकी दोन मुलींचा शोध घेण्यास पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. दरम्यान बालसुधारगृहातून मुली बाहेर गेल्याच कशा याची चौकशी करण्यात येणार आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प नंबर पाचमध्ये बालसुधारगृह असून तेथे बंदोबस्तदेखील नेहमी असतो. तिथे भिक्षेकरी तसेच बेघर मुलींना आश्रय दिला जातो. मात्र तेथून सहा मुली पळून गेल्याचे समजताच पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकामार्फत शोध सुरू केला. पोलिसांना त्यांच्या शोधमोहिमेमध्ये बालसुधारगृहातून पळालेल्या सहापैकी दोन मुलींचा छडा लागला. त्या ठिकाणी आम्हाला राहायचे नव्हते म्हणून पळून गेल्याचे मुलींनी सांगितले. अजूनही चार मुलींचा शोध सुरू असून लवकरच त्याही सापडतील, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

अद्याप चार मुली फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना करण्यात आले आहे. या पथकाने बालसुधारगृह परिसर व आसपासच्या रेल्वे स्टेशन बस डेपो परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेण्याचे कार्य सुरू केले आहे. तसेच ताब्यात घेतलेल्या दोन मुलींकडून फरार मुलींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.