
अहमदाबादच्या जलतरण तलावात महाराष्ट्राच्या सियाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिला. खेलो इंडिया अस्मिता राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सिया देवरुखकरने दुहेरी रौप्य पदक जिंकत क्रीडाक्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. विलेपार्लेच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या या जलतरणपटूची मेहनत अखेर पदकांमध्ये परिवर्तित झाली.
नुकत्याच वीर सावरकर क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत 18 वर्षांखालील गटात सियाने अप्रतिम कामगिरी केली. 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक आणि 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या दोन्ही प्रकारांत तिने रौप्य पदकावर नाव कोरले. जलतरण तलावात तिच्या स्ट्रोक्सची अचूकता आणि वेग पाहून प्रतिस्पर्ध्यांनाही चक्रावून टाकले. फ्रीस्टाईल प्रकारातही सियाने चांगली झुंज दिली. 50 मीटर आणि 100 मीटर फ्रीस्टाईलमध्ये ती पाचव्या स्थानावर राहिली, पण तिचा जिद्दीचा खेळ प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. तिच्या या दुहेरी रौप्य कामगिरीने आगामी स्पर्धांसाठी तिच्याकडून सुवर्ण कामगिरीची अपेक्षा आणखी उंचावली आहे.


























































