राज्याचे ‘कौशल्य प्रशिक्षण’ रोजगाराभिमुख नाही

285

अकुशल कामगार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना नोकरी अथवा स्वयंरोजगार देण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने राज्यात सुरू करण्यात आलेल्या चार व्यवसाय प्रशिक्षण योजनांचा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. 2019 मध्ये तब्बल 4 लाख 57 हजार 548 विद्यार्थ्यांनी विविध योजनांतर्गत कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षणासाठी नोंदणी केली. प्रत्यक्षात मात्र यांपैकी 1 लाख 48 हजार म्हणजेच केवळ 47.73 टक्के विद्यार्थीच ‘रोजगारक्षम’ बनले आहेत. कौशल्य विकास सोसायटीच्या अहवालातून ही बाब उघड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या वतीने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2.0, दीनदयाळ अंत्योदय योजना, प्रमोद महाजन कौशल्य व विकास उद्योजकता अभियान आणि जिल्हा पुरस्कृत विकास योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यांपैकी प्रमोद महाजनांच्या नावे सुरू असलेल्या योजनेसाठी तत्कालीन सरकारने 90 कोटी रुपयांची तरतूद केली, पण ही तरतूद अत्यंत तोकडी असून हा निधी वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननुसार राज्यात दरवर्षी 15 लाख 47 हजार 811 प्रशिक्षित कुशल मनुष्यबळाची गरज आहे, मात्र या तुलनेत कौशल्य विकास सोसायाटीकडून केवळ 2.12 टक्केच प्रशिक्षित कुशल मनुष्यबळाची निर्मिती होत आहे.

2015 ते 2019 पर्यंतच्या कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ संख्या – 82 हजार 753. n राज्य पुरस्कृत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास योजनेतील प्रशिक्षित विद्यार्थी (2015 ते 2019) – 1,30,947. याच योजनेतील वर्षाकाठी प्रशिक्षित विद्यार्थी – 32 हजार 737

तत्कालीन सरकारचे कौशल्य विकासाकडे दुर्लक्ष

राज्याच्या तत्कालीन सरकारने कौशल्य विकासासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. कौशल्य विकास सोसायटीशी जोडलेल्या प्रशिक्षण संस्थांना राज्य सरकारकडून येणारा निधी टप्प्याटप्याने मिळतो. शिवाय ही प्रक्रियादेखील अत्यंत जाचक आहे. जास्तीत जास्त संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी तसेच कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी या प्रक्रियेत योग्य ते बदल करण्याची मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे आणि मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. सुप्रिया करंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या