खासगी ट्रव्हल्स कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाने रातराणीच्या मार्गावर आणलेल्या नव्या ‘स्लीपर कम सीटर’ बसला कोल्हापूरकर प्रवाशांनी पसंती दिली आहे. परळ-पाटगाव (कोल्हापूर) मार्गावर सुरू केली. या बसने आठवडाभरात 2 लाख 16 हजार रुपयांचे उत्पन्न महामंडळाच्या तिजोरीत जमा केले. एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी स्लीपर बसेसचा समावेश केला होता. त्यानंतर काही कारणांनी ही बस बंद करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा महामंडळाने शयनयान ‘स्लीपर’ बसेस सुरू केल्या, परंतु वातानुकूलित तिकीट दर परवडत नसल्याने एसटीने विनावातानुकूलित ‘स्लीपर कम सीटर’ बसचा नुकताच समावेश केला आहे.़
200 बसेस ताफ्यात येणार
अशा प्रकारच्या एकूण 200 बसेस महामंडळाच्या ताफ्यात येणार असून त्यापैकी पहिल्या टप्यातील 50 बसेस आलेल्या आहेत. त्यापैकी 38 बसेसचे आरटीओकडून रजिस्ट्रेशन झाले आहे. राज्यातील सुमारे 30 मार्गावर या बसेस धावत आहेत. सध्या राज्यभरात 256 मार्गावर 512 बसेसद्वारे रातराणी सेवा दिली जाते. त्याच मार्गावर या नवीन बसेस चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे या बसचे तिकीट दर रातराणी बसेसच्या धर्तीवर आहेत.
परळ-पाटगाव ‘स्लीपर कम सीटर’ बसचे उत्पन्न
- 20 नोव्हेंबर 10,135 रु.
- 21 नोव्हेंबर 28,340 रु.
- 22 नोव्हेंबर 26,080 रु.
- 23 नोव्हेंबर 35,065 रु.
- 24 नोव्हेंबर 37,475 रु.
- 25 नोव्हेंबर 30,940 रु.
- 26 नोव्हेंबर 48,010 रु.





























































