
हिंदुस्थानात आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका वाहन उद्योगाला (ऑटो मोबाईल) बसला आहे. अनेक मोठ्या कंपन्यांवर त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता त्याच रांगेत आणखी एक मोठे नाव अशोक लेलँड देखील जोडले जाण्याची शक्यता आहे.
द हिंदूने सूत्रांआधारे माहिती प्रसिद्ध केली आहे. चैन्नईतील आपल्या प्लांटमध्ये अशोका लेलँड कंपनी पाच दिवसांसाठी काम बंद ठेवणार आहे. कंपनीकडून प्लांटच्या अधिकाऱ्यांना पाच दिवस काम बंद ठेवण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. बाजारात कर्मशिअल वाहनांची मागणी घटल्याचे लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
या वृत्तात म्हटल्यानुसार प्लांट पाच दिवसांसाठी बंद राहिल्यास त्याचा थेट परिणाम 5000 कर्मचाऱ्यांवर होणार आहे. या 5000 कर्मचाऱ्यांपैकी 3000 कर्मचारी हे कंत्राटी आहेत. असे असले तरी पाच दिवस काम बंद ठेवल्यास या पाच दिवसांचा पगार कापला जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भातील निर्णय कंपनीकडून नंतर घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशोका लेलँडने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
दरम्यान, या आधी टोयोटा मोटर्स आणि हुंडाई मोटारच्या वाहनांची विक्री देखील घटली असून त्यांनी गाड्यांच्या उत्पादनात कपात केल्याचेही बोलले जात आहे.
























































