क्षुल्लक वादातून शालेय विद्यार्थ्याने नववीच्या विद्यार्थ्यावर केले कोयत्याने वार

अवसरी खुर्द ता. आंबेगाव येथील भैरवनाथ विद्यालयात शिकणाऱ्या कुणाल विकास कराळे (15 )या इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेतीलच दहावीत शिकणाऱ्या मुलाने कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यात मुलाच्या डोक्याला व हाताला गंभीर जखम झाली असून त्याच्यावर मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शिक्षक ,विद्यार्थी, व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत मिळालेली माहिती नुसार, जखमी कुणाल कराळे व इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलाची एक महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होता. त्यावेळी शालेय शिक्षकांनी हा वाद मिटवला होता मात्र दहावीतील मुलाने खुन्नस डोक्यात धरून आज कोयता लपवून आणत कुणाल पुढे जात असताना शाळेच्या मैदानातच पाठीमागून कोयत्याने वार केले आहे . यात कुणालच्या हाताच्या बोटांना व डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. या बाबत शाळेतील शिक्षकांनी पोलिसांना माहिती देत जखमी कुणालला ताबडतोब मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर अधीक्षक डॉ. दुधवडे  यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.तेजस शिंदे, डॉ.श्वेता डोंगरे, डॉ.आकाश पावरा यांनी उपचार केले आहेत. घटनेची माहिती कळताच मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक शेखर शेटे, पो.कॉ, तुकाराम मोरे पुढील तपास करत आहे.
मोबाईल, टीव्ही, सोशल मीडियाचा वाढता वापर यामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असून अनेक मुले, तरुण साउथ फिल्म मोठया प्रमाणात पाहत असून दाक्षिणात्य फिल्म मध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी दाखवून त्यात कोयत्याचा वापर केला जातो. हे पाहूनच अल्पवयीन मुले देखील मोठ्या प्रमाणात कोयता वापरू लागले असल्याचे निदर्शनात येत आहे. पूर्वी शाळा कॉलेजमध्ये झालेली भांडणे हे किरकोळ स्वरूपाचे असायची मात्र आता किरकोळ भांडणातही कोयता, तलवारी, चाकू यासारख्या हत्याराचा वापर होत असल्याने शिक्षक, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.