
सामना ऑनलाईन । भोपाळ
सध्याच्या युगात स्मार्टफोन जीवनातील एक अविभाज्य घटक बनला आहे. स्मार्टफोनचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे वाईट परिणामही पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी तर हाच स्मार्टफोन कुटुंबकलहाचे मुख्य कारण देखील बनला आहे. भोपाळमध्ये तर नवरा स्मार्टफोन देत नाही म्हणून एका महिलेने चक्क कोर्टात धाव घेतली आहे.
भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्पोटासाठी आलेल्या खटला ऐकून न्यायाधीश देखील हैराण झाले. कारण या प्रकरणातील घटस्फोटाचे मुख्य कारण होते ते स्मार्टफोन. तत्नीचा असा आरोप होता की, तिचा पती स्वत: स्मार्टफोन वापरतो, मात्र आपल्याला साधा फोन वापरायला देतो. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन शेवटी प्रकरण घटस्फोटापर्यंत आले.
त्यावेळी पतीने देखील आपल्या व्यथा न्यायाधीशांसमोर मांडल्या. लग्नानंतर सुरुवातीला पत्नीकडे स्मार्टफोन होता. मात्र स्मार्टफोनमुळे पत्नी दिवसभर सेल्फी काढण्यात आणि फेसबुकवर गुंग असल्याने जेवायला मिळत नसल्याचे सांगितले आहे. बायकोच्या सेल्फीच्या नादामुळे म्हाताऱ्या आई वडिलांना पाव खाऊन दिवस काढावे लागत असल्याचेही त्याने सांगितले. या अजब खटल्यामुळे हैराण झालेल्या न्यायाधीशांनी महिलेला अगोदर घरातील कामं करून नंतर मोबाईल वापरण्याचा सल्ला देऊन समजूत काढली.
























































