
हिंदुस्थानची उपकर्णधार स्मृती मानधना आयसीसीच्या मंगळवारी जाहीर झालेल्या महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. मानधनाने इंग्लंडच्या कर्णधार नेट स्किव्हर-ब्रंट हिच्यावर तब्बल 83 गुणांची आघाडी घेतली आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत हिंदुस्थानची ऑफस्पिनर दीप्ती शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंडची डावखुरी फिरकीपटू सोफी एक्लेस्टोन पहिल्या स्थानी कायम आहे. स्मृती मानधनाने चालू विश्वचषकात सातत्याने अर्धशतके झळकावली असून इंग्लंडविरुद्ध इंदूर येथे झालेल्या रोमांचक सामन्यात तिने 88 धावांची शानदार खेळी केली होती.
स्मृतीचा अलीकडील फॉर्म अपूर्व आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत तिने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिला आयसीसीचा सप्टेंबर 2025 मधील ‘महिन्याची सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू’ म्हणून गौरविण्यात आले.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाची कर्णधार ऑलिसा हिली विश्वचषकातील सलग शतकांच्या जोरावर एक स्थान वर चढत तिसऱ्या स्थानी पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेची फॉर्मात असलेली फलंदाज ताजमिन ब्रिट्स हिनेही दमदार फलंदाजी करत एक स्थान वर चढून नवव्या क्रमांकावर आपली जागा पक्की केली आहे.
शीर्ष 10 च्या बाहेरही काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. हिंदुस्थानची कर्णधार हरमनप्रीत काwर हिने तीन स्थानांची झेप घेत 15 व्या स्थानी मजल मारली आहे, तर ऑस्ट्रेलियाची सलामीची फलंदाज फिबी लिचफिल्ड पाच स्थानांच्या प्रगतीनंतर 17 व्या, आणि इंग्लंडची अनुभवी हिथर नाईट तब्बल 15 स्थानांची झेप घेत 18व्या स्थानावर पोहोचली आहे.
गोलंदाजी क्रमवारीत दीप्ती शर्माने विश्वचषकातील पाच सामन्यांत घेतलेल्या 13 बळींच्या जोरावर तीन स्थानांची प्रगती साधत तिसरा क्रमांक पटकावला आहे. ऑस्ट्रेलियाची फिरकीपटू अॅलेना किंग दोन स्थान वर जाऊन सातव्या स्थानी पोहोचली आहे.