व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढल्याने नातेवाईकांमध्ये हाणामारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅप वापराचा छंद नात्यांमध्ये दुरावा निर्माण करत असल्याचा प्रकार हडपसरमधील मगरपट्टा सिटीत घडला आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढून टाकल्यामुळे नातेवाईकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना मगरपट्टा सिटीमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने तक्रार दिल्यानंतर मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला व आरोपी एकमेकांचे नातेवाईक असून ते सर्वजण मगरपट्टा सिटी परिसरात राहतात. सर्व नातेवाईकांचा एक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये दररोज चर्चा होत होती. एका नातेवाईकाने तक्रारदार महिलेला शनिवारी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढले. त्याचा राग आल्यामुळे महिला संबंधित नातेवाईकाच्या घरी गेल्या. त्यांनी संबंधिताला ग्रुपमधून काढल्याचा जाब विचारला. त्यावेळी आरोपींनी महिलेचा विनयभंग करीत त्यांचे पती, सासू व सासऱ्यांना शिवीगाळ केली. तक्रारीनुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.