बुलढाण्यातील अवलीया समाजसेवक ‘आमदार’ गणेश सोनुने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश देशमाने । बुलढाणा

सामाजिक कार्याची आवड असली की तुम्हाला काम करण्यासाठी ना शिक्षण ना परिस्थिती आडवी येत नाही. फक्त तुम्ही ठरविण्याचे काम आहे. असाच बुलढाणा तालुक्यातील हतेडी बु. येथील गणेश सोनुने हा युवक शिक्षण दहावी नापास. परिस्थिती गरिबीची. परंतु मनात जनसेवेची भावना. लोकांची सेवा करण्यात धन्यता मानणारा अवलीया समाजसेवक गणेश सोनुने याला आदराने आमदार या टोपण नावाने बुलढाण्यातील लोक संबोधतात.

गणेश सोनुने याचे वय ३२ वर्ष. घरात पत्नी, मुलगा, आई-वडील एवढा परिवार. हा युवक सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत आपल्या दीड एकर शेतात काम करुन त्याच्याकडे उदरनिर्वाहासाठी असलेल्या आठ बकर्‍या चारतो. बकर्‍या चारताना वृत्तपत्रांचे वाचन करतो. त्या बकर्‍या ११ वाजता गोठ्यात बांधून हा युवक जेवण करुन पांढरा शुभ्र पोशाख परिधान करुन खांद्यावर भगवा टाकून बुलढाण्याची वाट धरतो. दुपारी १२ च्या सुमारास बुलढाण्यात आला की शिवालय या शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात येतो. तिथे जे कोणी गरीब ज्याचे सरकारी दवाखाना, तहसील, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह ज्या कोणी कार्यालयात काम अडले असेल त्या ठिकाणी संबंधित ज्यांचे काम आहे त्यांना घेवून पायीच जातो. संबंधित अधिकार्‍यांना बोलतो व काम करत नसतील तर लोकप्रतिनिधींना फोन लावून सदर व्यक्तीच्या कामाची कल्पना देवून संबंधित अधिकार्‍यांना काम करुन देण्याचे सांगतो. कोणी अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना कायदेशीर इंगा सुद्धा दाखवितो. अशा प्रकारे गणेश सोनुने हा दररोज चार-पाच लोकांचे काम करतो. संध्याकाळी ५ वाजता घराची वाट पकडतो. पुन्हा शेतात जावून अंधार पडेपर्यंत काम करतो. आज गणेश सोनुने म्हटले की सर्व राजकिय नेते मंडळी, पत्रकार, अधिकारी, संबंध तालुका त्याला ओळखतो. गेल्या पाच वर्षापासून गणेश सोनुने याचा हा दिनक्रम सुरु आहे.

शिवसेनेवर व शिवसेनाप्रमुखांवर गणेश सोनुने याची प्रचंड श्रद्धा आहे. राजकारणातील शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे हे त्याचे आदर्श आहे. जनता राजकीय पुढारी त्याची तुलना महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी करतात. गणेश सोनुने याला या सामाजिक कार्याबद्दल विचारले असता तो म्हणतो दररोज दोन-चार गरीब लोकांचे काम होत नाही म्हणून निराश झालेल्या लोकांच्या चेहर्‍यावरचे काम झाल्यानंतरचे हास्य पाहिले की मला समाधान मिळते. समाधानासाठी मी हे करतो असे तो सांगतो.

गणेश सोनुने याचे लग्न दिपाली या तरुणीशी झाले आहे. गणेशने लग्नानंतर आपल्या पत्नीला पदवी पर्यंत शिक्षित केले असून शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे असे सांगून गणेशला आपल्या पत्नीला जिल्हाधिकारी बनविण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी तो स्पर्धा परिक्षेची पुस्तके पत्नीला वाचनासाठी नियमित नेत असतो. पत्नी सुद्धा गणेशच्या संसाराला शिलाई मशिनवर काम करुन हातभार लावत आहे. सध्या बुलढाणा शहर व परिसरात गणेश सोनुने याचा समाजसेवा हा चर्चेचा विषय आहे.