
सोलापूर जिल्ह्यात 70 वर्षांनंतर पहिल्यांदाच अतिवृष्टी आणि धाराशीव, अहिल्यानगर जिह्यांमधून होणारा दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, यामुळे सीना नदीला महापूर आला आहे. यामुळे माढा, मोहोळ, करमाळा, कुर्डुवाडी तालुक्यांत हाहाकार उडाला असून, 40 हून गावांचा संपर्क तुटला आहे. शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आल्याने ग्रामीण भागातील शाळांना तातडीने सुट्टी देण्यात आली आहे. एनडीआरएफचे बचावकार्य सुरू आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थितीचे चित्र अक्षरश- हाताबाहेर असून, कर्नाटकात जाणारे आणि पुणे-सोलापूर, सोलापूर-धुळे महामार्ग प्रभावित झाले आहेत. अतिवृष्टी आणि पाण्याचा विसर्ग यामुळे सीना नदीने रौद्ररूप धारण करत शेती, गावे, वाडय़ा-वस्त्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. माढा, करमाळा, मोहोळ व दक्षिण सोलापूर तालुक्यांतील तीन हजारांहून ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात आले आहे. प्रशासनाच्या वतीने बचावकार्याबरोबरच सुरक्षितता व सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सीना नदीत तब्बल दोन लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठचे सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंतचे गाव, शेती पाण्याखाली गेली आहे. माढा, मोहोळ व दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांना सिनेच्या महापुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्ह्यातील चांदणी, भोगावती, बोटी नदी, नीलकंठा नागझरी व राम नद्यांना महापूर आला आहे. बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढय़ासह अनेक तालुक्यांतील रस्ते पाण्याखाली असून, सुमारे 40 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
सीना नदीला यापूर्वी सन 1998, 2021 नंतर यंदाच्या वर्षी महापूर आला आहे. सोलापूर जिल्ह्यात बचावकार्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी दाखल झाली आहे. सध्या एनडीआरएफची दोन पथके माढा तालुक्यात बचावकार्य करीत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली आहे.
सीना नदीत दोन लाखांचा विसर्ग
सलग दोन दिवस आणि रात्री सुरू असलेला मुसळधार पाऊस तसेच अहिल्यानगर व धाराशिव जिह्यांत झालेल्या पावसामुळे सीना कोळेगाव, चांदणी, व खासापुरी प्रकल्पांतून अतिरिक्त जलसाठा तसेच भोगावती नदीमधून सीना नदीमध्ये मोठय़ा प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील उत्तर सोलापूर ग्रामीण माढा, करमाळा, बार्शी, मोहोळ, दक्षिण सोलापूर या तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील चांदणी, कोळेगाव आणि खासापूर प्रकल्पांतून जवळपास दोन लाख क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामध्ये चांदणी प्रकल्पातून 38 हजार, खासापूर प्रकल्पातून 77 हजार, कोळेगाव प्रकल्पातून 36 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी भीषण स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मोहोळमधील 288 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले
मोहोळ – वरच्या धरणातून सीना आणि भोगावती नदीत जवळपास दोन लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले असून, नदीकाठी भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुराने वेढा टाकल्याने अडकलेल्या 288 कुटुंबांना आज सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पूरस्थिती सुधरेपर्यंत शेतकऱयांनी सतर्क राहावे, अशा सूचना तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिल्या आहेत.
आज पुराने वेढलेल्या बोपले, पासलेवाडी, नरखेड, सावळेश्वर, तरटगाव, शिंगोली या गावांतील 288 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या पुराच्या पाण्यात शेतकऱयांची हातातोंडाला आलेली पिके वाया गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. कोळेगाव प्रकल्पातून पाणी सोडल्यापासून सीना आणि भोगावती नद्या गेल्या पंधरा दिवसांपासून धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.
माढा शहराकडे येणारे सर्व मार्ग बंद
माढा – दोन दिवसांपासून माढा तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. सीना नदीकाठच्या उंदरगाव दारफळ, राहुलनगर, केवड, मानेगाव परिसरातील लोकांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागत आहे. सीना नदीपात्रात 2 लाख क्युसेक पाणी येत असल्याने पूरपरिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माढा तालुक्यातील सातही मंडलांत 100 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडल्याने बंधारे, ओढे-नाले ओव्हरफ्लो झाले. म्हैसगाव मंडलात सर्वाधिक 174 मि.मी., रोपळे (क) मंडलात 142.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसामुळे माढाच्या दिशेने येणाऱया कुर्डुवाडी-माढा, माढा-वैराग, बार्शी-माढा मार्गावर पाणी आल्याने मार्ग बंद झाले. तीनही मार्ग बंद झाल्याने माढा शहराचा संपर्क तुटला आहे.
सीना नदीत सुमारे दोन लाख क्युसेक पाणी सोडल्यामुळे पूरपरिस्थिती कायम आहे. नदीकाठच्या शेतात पाणी घुसल्याने पिकांची हानी झाली आहे. केळी, द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तांदूळवाडी येथील तरंगे वस्तीवर 35 लोक, दारफळ येथे बरडवस्ती येथे 100 ते 150 लोक अडकून पडले. मानेगाव येथील वस्त्या पाण्यात आहेत. राहुलनगर गावाला पाण्याचा वेढा आहे. येथे आपत्कालीन व्यवस्थापन काम पाहत आहे.
माढा, मोहोळ, करमाळ्यात पावसाचे थैमान; सीना नदीला महापूर, 40 गावांचा संपर्क तुटला; ‘एनडीआरएफ’चे पथक दाखल; शाळांना सुट्टीमंगळवेढय़ात भिंत कोसळून मुलाचा मृत्यू
मुसळधार पावसात मंगळवेढा तालुक्यातील ढवळस गावात भिंत अंगावर पडून योगीराज हेंबाडे या 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर बहीण जागृती ही गंभीर जखमी झाली आहे.
माढय़ातील दारफळमधील 35 जणांना केले एअरलिफ्ट
माढा तालुक्यातील दारफळ येथे सीना नदीच्या महापुरात अडकलेल्या 35 नागरिकांना लष्कराच्या हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान, दारफळ येथे एनडीआरएफचे एक पथक सोमवारपासून बचावकार्य करत आहे. मंगळवारी आणखी एका पथकाला पाचारण करण्यात आले. नागरिकांना एअरलिफ्ट करण्यासाठी कुमार आशीर्वाद यांनी लष्कराशी संपर्क साधला. त्यानंतर नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली.
संगोबा पूल पाण्याखाली; करमाळा-परांडा रोड बंद
करमाळा – करमाळा तालुक्यात होत असलेला मुसळधार पाऊस तसेच जामखेड, आष्टी, खडकत भागांतील मुसळधार पावसामुळे करमाळा तालुक्यातील सीना नदीला महापूर आला. संगोबा येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेल्याने बोरगाव, घारगाव, पाडळी, बाळेवाडी, तरडगाव बाळेवाडी, वाघाचीवाडी या गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. तर, करमाळा-परांडा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. करमाळा-परांडा हद्दीवर असलेल्या सीनाकाठच्या आवाटी गावात पाणी घुसले आहे. गावातील जिल्हा परिषद मराठी व ऊर्दू शाळा पाण्याखाली गेल्या आहेत.
तानाजी सावंतांच्या बंगल्याला पाण्याचा वेढा; टोयोटा, फॉर्च्युनर गाडय़ा बुडाल्या
माढा तालुक्यातील वाकाव येथे सीना नदीकाठी असलेल्या आमदार तानाजी सावंत यांच्या बंगल्याला आज पुराच्या पाण्याने वेढा घातला. यावेळी घरात अडकलेल्या कुटुंबीयांना बोटीच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. तर सावंत यांच्या बंगल्याबाहेर लावण्यात आलेल्या टोयोटा, फॉर्च्युनर आणि ट्रक्टर पाण्यात बुडाले.
कुर्डुवाडीत ओढय़ाच्या पुरात बुडून मुख्याध्यापकाचा मृत्यू
कुर्डुवाडी – मुसळधार पावसामुळे बेंद ओढय़ाला आलेल्या पुराच्या पाण्यात घाटणे (ता. माढा) येथील रहिवासी व जिल्हा परिषद भेंड शाळेचे मुख्याध्यापक संतोष (बापू) गाडे हे रविवारी भोसरे-घाटणे पुलावरून जात असताना दुचाकीसह वाहून गेले होते. दरम्यान, आज तिसऱया दिवशी त्यांचा मृतदेह भोसरे येथील ओढय़ात आढळून आला. गाडे यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.