परप्रांतीय मजुराने केलं मुलीचे अपहरण, धुळ्यातून मुलीची सुटका; तिघे ताब्यात

सोलापुरात कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुराने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल होताच काही तासांत धुळे येथून मुलीची सुटका केली असून, तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सोलापूर शहरात सध्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामावर मोठय़ा प्रमाणावर परप्रांतीय मजूर काम करीत आहेत. उत्तर कसबा तरटी नाका परिसरात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी एका मजुराने याच परिसरातील अकरा वर्षांच्या मुलीबरोबर काही दिवसांपासून जवळीक साधत ओळख वाढविली होती.या परिसरातील काम संपल्याने हा मजूर मुलीला सोबत घेऊन गावाकडे गेला. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी परत न आल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली व फौजदारी चावडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असता, परप्रांतीय मजुराबरोबर मुलगी बोलताना पाहिल्याचे काही जणांनी सांगितले. या माहितीच्या आधारे इतर कामगारांची चौकशी केली असता काही कामगार इंदोरला गेल्याचे समजले.

पोलिसांनी मोबाईल लोकेशन पाहून गायब झालेली मुलगी त्यांच्याबरोबर असल्याची माहिती काढली. सदर मुलगी व मजुरासह तिघांना पोलिसांनी धुळे येथे जाऊन ताब्यात घेतले. या तिघांवर सोलापुरात आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या