परतीच्या पावसाने सोलापूर जिह्याला झोडपले, शहर जलमय, घरांची पडझड, पिकांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर शहर व जिल्हय़ाला परतीच्या पावसाने झोडपले असून, अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील नागरी वस्त्या व रस्ते जलमय झाले असून, एस.टी. बससेवा बंद करण्यात आली आहे. ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरातील सभामंडपात पाणी शिरले असून, प्रमुख वाहतुकीच्या बोगद्यांत मोठय़ा प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. शहरातील अनेक जुन्या घरांची पडझड झाली असून, नाल्याच्या कडेला राहणाऱयांचे प्रचंड नुकसान झाले. ग्रामीण भागात शेती व पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, ओढे, नद्या तुडुंब भरून वाहात आहेत. तर, शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. 24 तासांत तब्बल 100 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, पावसाची संततधार सुरूच आहे.

सोलापूर शहर व जिल्हय़ात गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाची धुवाधार बरसात सुरू आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते, तर रामवाडी आसरा पुलाजवळ रेल्वे स्टेशन परिसरात वाहतुकीसाठी बांधण्यात आलेल्या बोगद्यामध्ये पाण्याचा निचरा न झाल्याने कमरेइतके पाणी साचले होते.

शहरातील नालेही पाण्याने ओसंडून वाहू लागल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली. या पावसामुळे कधी नव्हे ते सोलापूर रेल्वे स्थानकातील रुळांवर फलाटापर्यंत पाणी साचले होते. शहर व जिल्हय़ाबाहेर पावसाच्या जोरदार तडाख्यामुळे एस.टी. बससेवाही बंद करण्यात आली. चपळगावमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, दुधनी गावालाही तडाखा बसल्याने कर्नाटकातील वाहतूक सेवा बंद झाली. शहरात शेळगी, आसरा, रामवाडी, लिमयेवाडी, माशाळवस्ती, जुनापुने नाका, तिऱहेगाव, संभाजी तलाव परिसरातील सोसायटय़ा व नागरीवस्त्यांत पाणी शिरल्याने मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.

सोलापूर जिल्हय़ात यंदा पावसाने साथ दिली होती. परंतु, परतीच्या पावसाने अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण केल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील कुरुनुर धरण, बोरगाव, बादोले, चपळगाव, बार्शी तालुक्यांतील भोगावती नदी धोक्याच्या पातळीवरून वाहात होती. ऊस, तूर, सोयाबीन, फळबागा, मूग, भाजीपाला आदींचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणारे 14 व 15 रोजीचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने नेटवर्कची अडचण विद्यार्थ्यांना येत होती. त्यामुळे या दोन दिवसांचे पेपर 19 व 20 रोजी घेण्यात येणार आहेत.