जिह्यातील साखर कारखानदार जोपर्यंत तीन हजार पाचशे रुपये दर जाहीर करत नाहीत, तोपर्यंत उसाला कोयता लावू दिला जाणार नाही, असा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला.
दुधाला प्रतिलिटर 42 रुपये, म्हशीच्या दुधाला 72 रुपये दर जाहीर करावा, या व इतर मागण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. 1) कुरुल येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोहोळ-मंद्रूप महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी देशमुख बोलत होते.
कोल्हापूर, सांगली जिह्यामध्ये उसाला अधिक दर दिला जातो. राज्यात मंत्री, आमदार, खासदारांचे साखर कारखाने आहेत. साखर कारखान्यामध्ये रिकव्हरी चोरून काटामारी होत असते. उपपदार्थ निर्मितीमधून फायदा होतो. मात्र, साखर कारखानदारांची शेतकऱयांना चार पैसे जास्त देण्याची इच्छा होत नाही हे दुर्दैव आहे, असा हल्लाबोल देशमुख यांनी केला. ‘विठ्ठल’ आणि शिंदे सहकारी साखर कारखान्याने चालू वर्षी 3500 दर जाहीर केला आहे. मग इतर कारखानदार मूग गिळून गप्प का आहेत? त्यांनी हाच दर जाहीर करावा अन्यथा उसाला कोयता लावू देणार नाही, असा इशारा देशमुख यांनी दिला.
दूध उत्पादक शेतकऱयांचे चालू वर्षीचे पाच रुपये थकीत अनुदान व एक ऑक्टोबरपासून जाहीर केलेले सात रुपये अनुदान पंधरा दिवसांत दूध उत्पादकाच्या खात्यावर जमा करावे, पशुखाद्याचे दर 50 टक्के कमी करावेत, या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी चंद्रकांत निकम, सुरेश नवले, बिरू वाघमोडे, सीताराम जाधव, किसनबापू जाधव, नागनाथ जाधव, नाना मोरे, घोलप महाराज, प्रमोद लांडे, छत्रपती जाधव, सुभाष माळी, गहिनीनाथ जाधव, संजय कुलकर्णी, दाजी मासाळ, आनंद पाटील, संभाजी मासाळ, प्रकाश पारवे, पांडुरंग गुरव, औदुंबर गायकवाड उपस्थित होते.
आंदोलन दीड तास चालल्याने मोहोळ-मंद्रुप महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरळीत केली.