
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी शुक्रवारी भरसभागृहात महापौर श्रीकांचना यन्नम यांना शिवीगाळ करत नगरसचिव रवींद्र दंतकाळे यांना पाण्याने भरलेली बाटली फेकून मारली. या धक्कादायक घटनेने सभागृहातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. ज्येष्ठ सदस्याला बाहेर काढण्यासाठी महापौरांना सभागृहात पोलिसांना बोलवावे लागले. यामुळे शहरात भाजपातील बंडाळी पुन्हा उफाळून आल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, महापालिकेच्या इतिहासात भाजपची कारकीर्द सोलापूरकरांना मान शरमेने खाली घालायला लावणारी ठरली असून, सभागृहाची प्रचंड नाचक्की होत असल्याच्या प्रतिक्रिया शहरातून उमटत आहेत.
सोलापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा आज महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. सभेच्या सुरुवातीला नगरसचिव रवींद्र दंतकाळे यांनी विषय वाचन सुरू केले होते. याला भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी आक्षेप घेत इतिवृत्तात न मिळाल्याची महापौर श्रीकांचना यन्नम यांच्याकडे तक्रार केली; परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे संतप्त झालेल्या पाटील यांनी स्वपक्षीय महापौरांवर पक्षपातीचा आरोप करत शिवीगाळ केली. तर, नगरसचिव बेकायदेशीर कामकाज घेतात. फक्त महापौरांचेच ऐकतात, असा आरोप करत पाण्याने भरलेली बाटली नगरसचिव दंतकाळे यांच्या दिशेने भिरकावली. त्यांनी ती चुकविल्याने थोडक्यात बचावले. यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली.
महापौरांना शिवीगाळ करणे व नगरसचिवावर बाटली फेकल्याप्रकरणी महापौर यन्नम यांनी सभागृहात पोलिसांना बोलावून घेऊन स्वपक्षातीलच नगरसेवक पाटील यांना सभागृहाबाहेर काढले. यामुळे सभागृहातील वातावरण खूपच बदलले होते. दरम्यान हा गोंधळ सुरू असताना भाजपचे इतर ज्येष्ठ सदस्य मात्र हा प्रसंग पाहण्याचा मनस्वी आनंद लुटत असल्याचे चित्र दिसत होते. यावेळी काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते किसन जाधव, आनंद चंदनशिवे, माकपाच्या कामिनी आडम यांनी हस्तक्षेप करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.
भाजप नगरसेवकाने महापौरांना शिवीगाळ करण्याची तिसरी घटना
सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. यापूर्वी भाजपाच्या नगरसेवकांनी भरसभागृहात महापौरांना शिवीगाळ करणे व त्यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडलेली नाही. पक्षांतर्गत वाद सभागृहात उकरून काढण्याचा नवा प्रघात भाजपने पालिकेत पाडला आहे. यापूर्वी महापौर शोभा बनशेट्टी यांना भरसभागृहात शिवीगाळ करण्यात आली होती. त्यानंतर विद्यमान महापौर श्रीकांचना यन्नम यांना सभागृहातच शिवीगाळीला सामोरे जाण्याचा दुसऱ्य़ांदा प्रसंग आला आहे.


























































