
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची जानेवारी महिन्यातील यात्रेबाबत महापालिका प्रशासन सकारात्मक असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी स्पष्ट केले.
सिद्धेश्वर यात्रा समितीचे चेअरमन भीमाशंकर पटणे यांच्या नेतृत्वाखाली देवस्थानच्या शिष्टमंडळाने खोराटे यांची भेट घेतली आणि यात्रेसंदर्भातील निवेदन दिले. 12 ते 15 जानेवारीदरम्यान श्री सिद्धेश्वर यात्रा भरत असते. यात्रेनिमित्त नंदीध्वजांची मिरवणूक निघते. श्री सिद्धेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांना प्रदक्षिणा घालण्यासाठी ही मिरवणूक विविध मार्गावरून जाते. शहरात स्मार्ट सिटी योजनेतून कामे सुरू आहेत. मिरवणूकमार्गावरील काही ठिकाणची कामे अर्धवट आहेत. काही ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
भाविकांना त्रास होऊ नये यासाठी ही कामे लवकर पूर्ण करावीत, असे निवेदनात नमूद केले आहे. यात्राकाळात होम मैदानावर धार्मिक विधी होत असतात. त्यासाठी हे मैदान 15 डिसेंबर ते 31 जानेवारीदरम्यान देवस्थानच्या ताब्यात देण्याचा करार आहे. याशिवाय मैदानाची स्वच्छता आणि नंदीध्वज मिरवणूक मार्गाची दुरुस्ती महापालिकेमार्फत करण्यात येते, अशी माहिती देण्यात आली.
महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर हे मुंबईला गेले असून ते परत आल्यानंतर होम मैदान देवस्थानच्या ताब्यात देण्याबाबत निर्णय कळवण्यात येईल, असे खोराटे यांनी सांगितले. होम मैदानाची स्वच्छता आणि नंदीध्वज मिरवणूकमार्गाची दुरुस्ती करून देण्याबाबत संबंधित विभागाला सूचना देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. देवस्थानच्या शिष्टमंडळाने सोलापूर स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांची भेट घेतली.

























































