
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत विविध अभ्यासक्रमांतून पीएच़ डी. करण्यासाठी यंदा तब्बल 650 जागांवर उमेदवारांना संधी मिळणार आहे. ‘पीएच. डी.’ प्रवेश परीक्षेच्या विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका इंग्रजी व मराठीतून असणार आहे, परंतु उमेदवारांना मराठी, इंग्रजी व हिंदीतून परीक्षा देता येणार आहे. विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाने तसा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे यंदाची पेट परीक्षा ऑनलाइन होणार आहे. या परीक्षेची उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर पाहता येणार आहे. सप्टेंबरच्या दुसऱया आठवडय़ात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पीएच. डी.साठी एकूण चार थेअरी पेपर द्यावे लागतात. त्यातील दोन पेपर सर्वांसाठी सारखेच असतात, तर दोन पेपर त्या-त्या विषयांसंबंधी असतात. नव्याने पीएच. डी.साठी प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांचे ‘कोर्स वर्क’ घेतले जाणार आहे. त्यामध्ये पीएच. डी.साठी विषय कसा निवडावा? त्या संबंधीची कागदपत्रे कशी संकलित करावीत? पेपर कसे असतात? यांसह विविध मुद्दय़ांवर एकत्रितपणे सर्वांनाच मार्गदर्शन केले जाणार आहे.
ही संपूर्ण माहिती ऑनलाइन देणे अशक्य असल्याने कोरोनाची परिस्थिती पाहून सोलापूर विद्यापीठात त्यांना ऑफलाइन मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विकास कदम यांनी दिली आहे.
प्रॉक्टरिंग प्रणालीद्वारे प्रत्येक उमेदवारावर वॉच
‘पीएच. डी.’च्या 650 जागांसाठी आतापर्यंत एक हजार 600 इच्छुकांनी विद्यापीठाकडे ऑनलाइन अर्ज केले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आणखी सहा दिवस आहे. त्यामुळे अंदाजित चारशे ते पाचशे अर्ज वाढण्याची शक्यता आहे. पीएच. डी. परीक्षेपूर्वी इच्छुक उमदेवारांची पेट परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा पारदर्शक व्हावी म्हणून विद्यापीठाकडून प्रॉक्टरिंग प्रणालीचा (विद्यार्थ्यांची हालचाल व लोकेशन टिपणारे तंत्रज्ञान) वापर केला जाणार आहे. प्रत्येक उमेदवारावर या प्रणालीतून वॉच ठेवला जाणार आहे.
विद्यापीठाचे नियोजित वेळापत्रक
पेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 10 ऑगस्ट.
17 व 18 ऑगस्ट रोजी होणार ऑनलाइन ‘पेट’ परीक्षा.
20 ऑगस्टला उमेदवारांना दिली जाणार उत्तरपत्रिका.
24 ऑगस्ट रोजी जाहीर होणार निकाल.
6 सप्टेंबरनंतर सुरू होईल ‘पीएच. डी.’ची प्रवेश प्रक्रिया.
पीएचडीची प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरच्या दुसऱया आठवडय़ात सुरू होईल. तत्पूर्वी, विविध अभ्यासक्रमांसाठी उमेदवार निवडण्यासाठी ‘पेट’ परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा पारदर्शक व्हावी म्हणून प्रॉक्टरिंगचा वापर केला जाणार आहे.
– विकास कदम संचालक, परिक्षा व मूल्यामापन मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.




























































