भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअपची पोलीस व्हॅनला धडक

540

पिकअप व्हॅन आणि पोलीस जीपची समोरासमोर धडक झाली़ या धडकेत टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्यासह चार पोलीस कर्मचारी व दोन पोलीस मित्र जखमी झाले आहेत.ही घटना पुणे – सोलापूर महामार्गावरील भिमानगर येथील एका ढाब्याजवळ सोमवारी रात्री उशिरा घडली.

दरम्यान,अपघातातील जखमींवर टेंभुर्णी येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक बाबर,पोलीस कॉन्स्टेबल धनाजी शेळके, चालक महेश निळ तसेच पोलीस मित्र राजू बनसोडे व हनुमंत लांडगे हे गंभीर जखमी झाले आहेत.

कोरोना वायरच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन करण्यात आल्याने जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.पुणे – सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील भीमानगर येथील चेक पोस्टला भेट देण्यासाठी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे पोलीस कर्मचाऱ्यांसह शासकीय जीपमधून गेले होते़ तेथे गेल्यानंतर त्यांना एका पोलीस कर्मचाऱ्याचा फोन आला की वेणेगाव येथे काही लोक ट्रक आडवून लूटमार करीत आहेत. ही खबर मिळाल्याने पोलीस निरीक्षक केंद्रे हे शासकीय जीपमधून टेंभुर्णीकडे येत असताना भिमानगर येथील सरदारजींच्या ढाब्याजवळ भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअपने पुण्याकडे जाण्यासाठी अचानक यूटर्न घेतल्याने पोलिसांची जीप त्या पिकअपवर जावून आदळल्याने हा अपघात झाला.अपघातानंतर पिकअप चालक पळून गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या