
जिल्हा परिषदेच्या जवाहरलाल नेहरू वसतिगृहाचा पाणीपुरवठा गेल्या 15 दिवसांपासून बंद आहे. चार दिवसांपासून या वसतिगृहातील विद्यार्थी अंघोळीविना राहत असून, ऐन परीक्षेच्या काळात पाण्यासाठी पेट्रोल पंप, सार्वजनिक पाणपोईच्या ठिकाणी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी रिकाम्या बादल्यांसह अर्धनग्न आंदोलन करून आपली व्यथा मांडली आहे.
सोलापुरातील पार्क चौकात जिल्हा परिषदेचे जवाहरलाल नेहरू शासकीय वसतिगृह आहे. ग्रामीण भागातील जवळपास 450हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी येथे राहतात. या वसतिगृहात गेल्या 15 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद झाला आहे. नुकतेच बनविण्यात आलेले पाण्याचे फिल्टर नादुरुस्त झाले आहे. वसतिगृहात पाणीच नसल्याने गेल्या चार दिवसांपासून अंघोळ न करता विद्यार्थी परीक्षेसाठी जात आहेत. अस्वच्छता पाचवीला पुजलेली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी अभ्यास सोडून सार्वजनिक पाणपोई व पेट्रोल पंपावर जाऊन पाणी आणून विद्यार्थी आपली तहान भागवत आहेत.
पाण्याच्या तीक्र टंचाईला सामोरे जाणाऱ्या या विद्यार्थ्यांनी आज टॉवेल गुंडाळून, हातात बादल्या, कपडे व झाडू घेऊन अर्धनग्न अवस्थेत जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. ‘पाणी द्या, पाणी द्या’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेले होते. अधीक्षकांकडे वारंवार मागणी करूनही पूर्तता होत नसल्याने आज विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. पाण्याची सोय न केल्यास जिल्हा परिषदेमध्ये ठाण मांडून बसू, असा इशारा शंकर मैंदर्गीकर व सिराज इनामदार आणि विद्यार्थ्यांनी दिला आहे.

























































