सौरऊर्जा वापरात महावितरण नापास, साडेतीन हजार दशलक्ष युनिटचे लक्ष अपूर्णच

253

स्वस्त आणि पर्यावरणपूरक ऊर्जा अशी ओळख असलेली सौरऊर्जा वापराचे टार्गेट पूर्ण करण्यात महावितरण नापास झाले आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात महावितरणने सुमारे साडेतीन हजार दशलक्ष युनिट वीज सौरऊर्जा प्रकल्पातून घेणे बंधनकारक होते, मात्र त्यांनी केवळ 1500 दशलक्ष युनिट म्हणजे 45 टक्के एवढी कमी वीज घेतली आहे. यावरून महावितरण पर्यावरणपूरक विजेचा वापर करण्यास उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प म्हणजे सौर आणि पवन ऊर्जानिर्मितीला चालना मिळावी म्हणून प्रत्येक वीज वितरण कंपनीने आपल्या एकूण वीज वितरणाच्या सुमारे 14 टक्के वीज अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पातून घेणे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने बंधनकारक केले आहे. त्यापैकी अडीच टक्के वीज सौर प्रकल्पातील असणे अवश्यक आहे. त्यानुसार महावितरणने 2018-19 या वर्षात जवळपास साडेतीन हजार दशलक्ष युनिट एवढी वीज घेणे अवश्यक होते, पण ते टार्गेट पूर्ण झालेले नाही. दरम्यान, रूफ टॉप सोलर नेटमीटरिंगच्या माध्यमातून तयार होणारी वीज हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कामी येत असतानाही महावितरण रूफ टॉप सोलर नेटमीटरिंगबाबत प्रतिकूल भूमिका घेतली जात आहे, असा सवाल केला जात आहे.

भविष्यात साडेतेरा टक्के वीज वापराचे उद्दिष्ट

केंद्र सरकारने 2025 सालापर्यंत देशात 1 लाख 75 हजार मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या पार्श्वभूमीवर सौरऊर्जेचा वापर वाढवा म्हणून वीज आयोगाने 2024 पासून पुढे सुमारे साडेतेरा टक्के एवढे सौर ऊर्जा वापराचे उद्दिष्ट दिले आहे. सदर उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास प्रतियुनिटमागे सुमारे 10 पैसे एवढा दंड लावण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या