
सामना प्रतिनिधी, मुंबई
देशातील सर्वात मोठा तंत्रज्ञान उत्सव म्हणून ख्याती असलेल्या आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’मध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाचे विविध आविष्कार पाहायला मिळतात. सौरऊर्जेला प्रोत्साहन देणाऱया आयआयटी मुंबईच्याच ‘सोल्स’ कार्यक्रमांतर्गत टेकफेस्टच्या निमित्त ‘सोलार चहा स्टॉल’चे उद्घाटन केले जाणार आहे.
देशातील पारंपरिक चहा स्टॉलप्रमाणेच हा आयआयटीचा चहा स्टॉल बनवला गेला आहे. त्यात चहा बनवण्यासाठी एलपीजी किंवा केरोसिनवर पेटणारा स्टोव्ह नाही. त्यावर सोलार इंडक्शन कुक-स्टोव्ह ठेवण्यात आला आहे. या स्टोव्हला ऊर्जा पुरवण्यासाठी स्टॉलच्या छपरावर सोलार पॅनेल्स बसविण्यात आले आहेत. जेव्हा स्टोव्ह चालू नसेल तेव्हा बॅटरी चार्ज होईल. या बॅटरीचा वापर सूर्यास्तानंतर स्टोव्हला ऊर्जा पुरवण्यासाठी होईल. बॅटरी एकदा चार्ज झाली की इंडक्शनवर 180 ते 200 कप चहा बनवता येऊ शकतो.
























































