
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला एक महिना झाला. परंतु, अजूनही हल्ल्यातील चार क्रूर दहशतवादी मोकाट आहेत. पर्यटकांचा धर्म विचारत त्यांनी 15 मिनिटे अंदाधुंद गोळीबार करत 26 निरपराध पर्यटकांचे बळी घेतले. या दहशतवाद्यांना पकडण्यात अद्याप राष्ट्रीय तपास यंत्रणेला यश आलेले नाही. हल्ल्यात 5 दहशतवादी होते. आतापर्यंतच्या तपासात तीन नावे समोर आली असून त्यात आदिल, मुसा आणि अली यांचा समावेश आहे. तिघांवर प्रत्येकी 20 लाख रुपयांचे बक्षीस आहे. दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 3 हजारांहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. तर 113 जणांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे सुपुत्र संदीप गायकर कश्मीरात शहीद
अहिल्यानगरमधील अकोले तालुक्याचे सुपुत्र, जवान संदीप पांडुरंग गायकर यांना जम्मू-कश्मीरमधील किश्तवाडमध्ये बुधवारी रात्री दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले. ते सैन्य दलाच्या मराठा बटालियनमध्ये जम्मू-कश्मीरमध्ये सेवा बजावत होते. अवघ्या 9 महिन्यांपूर्वी ते लष्करात दाखल झाले होते. संदीप यांना वीरमरण आल्याच्या बातमीने अकोले तालुका शोकसागरात बुडाला आहे. दरम्यान, उद्या शुक्रवारी ब्राह्मणवाडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.