पोलिसांचे निलंबन मान्य नाही, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवा; सूर्यवंशी कुटुंबाची मागणी

सोमनाथला कोठडीत मरेपर्यंत मारहाण करणाऱ्या पोलिसांचे निलंबन ही अतिशय क्षुल्लक कारवाई आहे. या पोलिसांचे निलंबन आम्हाला मान्य नाही, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी सूर्यवंशी कुटुंबाने केली.

पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि आमदार सुरेश धस प्रत्यक्ष आमच्याशी बोलले नाहीत. तेथे झालेला निर्णय असमाधानकारक आहे. आम्हाला तो मान्य नाही. सोमनाथला कोठडीत मारहाण करणाऱ्या पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी ही आमची मागणी मान्य होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा सोमनाथच्या आई विजया सूर्यवंशी यांनी दिला आहे.

मनधरणी करून लाँगमार्च थांबवला

सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून देण्यासाठी भीम अनुयायांनी परभणी ते मुंबई असा लाँगमार्च काढला. या लाँगमार्चला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून फडणवीस सरकार हादरले. मार्च नाशिक येथे पोहोचताच परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी मार्चमधील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. ‘तुमच्या मागण्या मान्य करतो, पुढील लाँगमार्च स्थगित करा’, अशी विनवणी केली. त्यानंतर हा लाँगमार्च स्थगित करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश धस यांनी सोमनाथला मारहाण करणाऱ्या पोलिसांना मोठय़ा मनाने माफ करा, असे वक्तव्य केले होते. त्यावरून मोठा गहजब उडाला आहे.