चांगले जेवण करत नाही म्हणून मुलाकडून आईची हत्या, मुलाला जन्मठेप

770

चांगले जेवण करता येत नाही, एकटी बडबड करत असल्याच्या रागातून एका मुलाने आपल्याच आईची हत्या केली आहे.  या प्रकरणी महिलेचा मुलगा अनंत उर्फ महेश चंद्रकांत चव्हाण (32 रा. आकेरी गावडेवाडी, कुडाळ) याला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी जन्मठेप आणि 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने वकील संदेश तायशेट्टे यांनी काम पाहिले.

आपल्या आईला जेवण व्यवस्थित करता येत नाही. ती घरात एकटीच बडबडत राहते याचा राग मनात ठेवून आरोपी अनंत चव्हाण याने 30 मार्च 2018 रोजी दुपारी 12:30 च्या सुमारास घरात गिरणीवरून जळणासाठी चिरुन आणलेल्या लाकडी फळकुटीने आपली आई मयत सौ मनीषा चंद्रकांत चव्हाण (60 रा. आकेरी गावडेवाडी) हिच्या डोक्यावर वार केले. तसेच पाळ कोयत्याने मानेवर वार करून जीवे मारले होते. दरम्यान मयत मनीषा यांचे भाऊ बाबली पांडुरंग चव्हाण हे आपले दुकान बंद करून आपली बहिण मनीषा यांच्या घराजवळील नळावर हात पाय धुवायला आले असता बहिणीच्या घरातून त्यांना आवाज आला. म्हणून त्यांनी घरात डोकावून पाहिले असता अनंत हा मनीषा यांच्या डोकीवर फळीच्या तुकड्याने वार करीत असल्याचे दिसून आले. या प्रकारात घाबरलेल्या बाबली चव्हाण यांनी शेजारी पाजारी यांना याची कल्पना दिली. तसेच याबाबतची फिर्याद कुडाळ पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी आरोपी याच्या विरोधात भादवि कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला त्याच दिवशी अटक केली होती.

या खटल्याची सुणावणी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात चालली यावेळी एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. यातील प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथील वैद्यकीय अधिकारी अमित लवेकर आणि संजयकुमार कल्कुटकी या वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच जिल्ह्यातील डॉक्टर स्मिता पंडित यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच आपल्या आईला मारल्यानंतर आरोपी अनंत याच्या कपड्यांवर पडलेले रक्त आणि त्याच्या बोटाला झालेली जखम आदि बाबींचा डीएनए रिपोर्ट या तपासात महत्त्वाचा ठरला. या प्रकरणाचा तपास कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए एल भोसले आणि उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी केला.

खरोखरच मुलगा आईचा खून करू शकतो का : न्यायालयालाही प्रश्न
या खून प्रकरणानंतर तपासणीच्या वेळी कुडाळ तालुका न्यायालयाने मुलगा आईचा खरोखरच खून करू शकतो का? असा सवाल करत याचा तपास व्हावा आणि हा खून त्याने कोणत्या मानसिक स्थितीतून केला. की त्याची मानसिक स्थिती योग्य नाही, त्यामुळे त्याने हे कृत्य केले का याची तपासणी करण्याकरिता अनंत उर्फ महेश चव्हाण या आरोपीला रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालय येथे पाठविले होते. मात्र त्याच्या मानसिक स्थितीमध्ये कोणताही बिघाड नाही. त्याची मानसिक स्थिती पूर्णपणे व्यवस्थित असल्याचा रिपोर्ट या रुग्णालयाने दिला होता.

जन्मठेपेची शिक्षा
आपल्या आईला जीवे मारल्याप्रकरणी आरोपी अनंत उर्फ महेश चव्हाण याला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस डी जगमलानी यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या