
उत्तर प्रदेशात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका भाजप नेत्याच्या मुलाने वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अभिनव सिंग असे या मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अभिनव हा बिजनौरचे स्थानिक नेते बिरबल सिंग यांचा मुलगा आहे. भाजपपुत्राची मुजोरी पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
काय आहे प्रकरण?
सध्या सोशल मीडियावर भाजपनेते बिरबल सिंग यांचा मुलगा अभिनव सिंग याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनव एका 70 वर्षीय वृद्धाला कानशीलात लगावत आहे. यावेळी वृद्ध व्यक्तीची पत्नी मध्ये पडली असता अभिनवने तिलाही कानशीलात लगावली आहे. पीडित वृद्ध निवृत्त बँकर आहेत.
‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 23 जुलै रोजी घडली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उजेडात आलं. दरम्यान, अभिनवने या वृद्ध दाम्पत्याला मारहाण का केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.
व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या मुजोर तरुणावर कारवाईची मागणी नेटकरी करत आहेत. मात्र आरोपी राजकीय नेत्याचा मुलगा असल्याने अद्याप त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे कारवाईची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.