
सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कर्करोग असल्याचे समोर आल्यानंतर फक्त तिच्या चाहत्यांना नाही तर संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला होता. या भयंकर आजारपणातही सोनाली सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांशी संवाद साधतेय व तिच्याबाबतची प्रत्येक गोष्ट शेअर करतेय. सोनालीने आज पुन्हा तिचा एक फोटो शेअर केला असून हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना जबर धक्का बसलाय. कर्करोगामुळे सोनालीचे संपूर्ण केस गळाले असून टक्कल पडले आहे. मात्र अशा परिस्थितीतही सोनालीने ‘बाल्ड इज ब्युटीफूल’ असे सांगत ती या आजारामुळे खचली नसल्याचे दाखवून दिले आहे.
सोनालीने तिच्या खास मैत्रिणी सुझान खान आणि गायत्री जोशी ओबेरॉय यांच्यासोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो हृतिक रोशनने काढला असून फ्रेंडशिप डे निमित्त सुझान आणि गायत्री सोनालीला भेटायला गेल्या होत्या. ‘माझे मित्र माझ्या आयुष्याचा आधार आहेत. मी त्यांची खूप आभारी आहे. अगदी शॉर्ट नोटीसवर माझे मित्र मला आधार देण्यासाठी मला मदत करण्यासाठी त्यांच्या बिझी शेड्यूलसमधूल वेळ काढून इथे आले आहेत. इथे नसतानाही ते कॉल, मेसेज, फेसटाईमवरून माझ्यासोबत असतात. ते एका क्षणासाठीही मला एकट वाटू देत नाहीत. खरी मैत्री काय असते ते तुम्ही मला दाखवलं. मी खूप लकी आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. यापुढे् मी कायम लवकरच तयार होईन जेणेकरून कारण आता मला केसांचा गुंता सोडवावा लागणार नाही’ अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.

























































