सोनम वांगचुक, भारत वाटवानी यंदाच्या मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनालाईन, मनिला

आशिया खंडाचा नोबेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी यंदा सोनम वांगचुक आणि भारत वाटवानी या दोन हिंदुस्थानी सेवाभावी कार्यकर्त्यांची निवड झाली आहे. येत्या ३१ ऑगस्टला मनिला (फिलिपाइन्स) येथे होणाऱ्या शानदार सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. आशियातील  सहा मान्यवर यंदा या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

लडाखसारख्या दुर्गम पहाडी भागात शिक्षण पद्धतीत कल्पक बदल, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आईस स्तूपांची उभारणी आणि लडाखी नागरिकांना व मुलांना प्रयोग व नव्या आधुनिक उपक्रमांची प्रेरणा ५१ वर्षीय सोनम वांगचूक  यांनी दिली आहे. त्यांच्या या बहुमूल्य कार्याची दखल रॅमन मॅगसेसे फाऊंडेशनने घेतली आहे. बेघर मनोरुग्णांवर उपचार करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारे श्रद्धा पुनर्वसन फाऊंडेशनचे संस्थापक भारत वाटवानी हे यंदाच्या मॅगसेसे पुरस्काराचे दुसरे हिंदुस्थानी ठरले आहेत.  

हेही ठरलेत आशियाई हिरो 

बहुमूल्य सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंधासाठी आपल्या कार्याचे योगदान देणारे अन्य चार आशियाईही मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यात कम्युनिस्ट बंडखोरांशी चर्चा करून त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणणारे फिलिपाईन्सचे हॉवर्ड डी, दिव्यांगांसाठी लढणारे व्हिएतनामचे पोलिओग्रस्त कार्यकर्ते वो थी होआंग येन रोम, कंबोडियाचे युक छांग आणि ईस्ट तिमोरचे मारिया डी लोर्देस मार्टिन्स क्रूझ यांचा समावेश आहे.