
माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ताप आणि सिस्टेमिक इन्फेक्शनमुळे सोनिया गांधी यांना 24 मार्चला सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी आता पूर्णपणे बऱ्या झाल्या असून मंगळवारी सकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
सर गंगा राम रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, ताप आल्यानंतर त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चाचण्यांमध्ये सिस्टेमिक इन्फेक्शनचे निदान झाले, त्यानंतर त्यांच्यावर अँटीबायोटिक्सने उपचार करण्यात आले. तज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली सोनिया गांधी यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या प्रकृतीत जलद सुधारणा झाली आहे. डॉक्टरांनी आता त्यांची प्रकृती सामान्य असल्याचे जाहीर केले आहे. पुढील उपचार आणि नियमित तपासणीसाठी त्यांना घरी सोडण्यात आले आहे.


























































