
इराणविरुद्धच्या युद्धात मिळवलेल्या यशाचे कौतुक करत, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी संध्याकाळी सांगितले की, इस्रायल आणि अमेरिका यांची संयुक्त मोहीम इराणमधील इस्लामिक राजवटीला पद्धतशीरपणे चिरडून टाकत आहे. त्याचबरोबरीने या मोहिमेमुळे ज्यू राष्ट्राच्या अस्तित्वाला असलेला धोकाही दूर केला जात आहे.
हिब्रू भाषेत राष्ट्राला संबोधित करताना नेतन्याहू यांनी या गोष्टीवर भर दिला की, आज ना उद्या इराणची राजवट कोसळणारच आहे. त्याच वेळी, तेहरानमधून निर्माण होणाऱ्या सामायिक धोक्याचा सामना करण्यासाठी इस्रायल या क्षेत्रातील महत्त्वाच्या देशांशी नवीन युती निर्माण करत आहे.
इस्रायलच्या पंतप्रधानांनी कोणत्याही विशिष्ट देशाचा उल्लेख केला नाही; मात्र जाता-जाता त्यांनी असे म्हटले की, “लवकरच, मी तुम्हाला या अत्यंत महत्त्वाच्या युतींबद्दल अधिक माहिती देऊ शकेन.” इराणमधील दुष्ट राजवटीविरुद्धची आमची सिंहगर्जना संपूर्ण जग ऐकत आहे. हा संघर्ष असा आहे की, आम्ही अफाट यश संपादन केले आहे. असेही नेतन्याहू यावेळी म्हणाले. जमिनीवरील लष्करी कारवाईत चार सैनिकांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण राष्ट्र शोकसागरात बुडालेले होते. त्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, हे यश मिळवण्यासाठी आम्हाला वेदनादायी किंमतही मोजावी लागली आहे.
यावेळी अधिक बोलताना नेतन्याहू म्हणाले, अमेरिकेसोबतच्या आमच्या संयुक्त मोहिमेला एक महिना पूर्ण झाला आहे. आम्ही त्या दहशतवादी राजवटीला पद्धतशीरपणे चिरडून टाकत आहोत, जी अनेक दशकांपासून अमेरिकेचा नाश असो, इस्रायलचा नाश असो’ अशा घोषणा देत आली आहे. अयातुल्लांच्या त्या राजवटीने आमचा सर्वनाश करण्यासाठी, मध्यपूर्वेवर ताबा मिळवण्यासाठी आणि संपूर्ण जगाला धमकावण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले होते,” असा दावा यावेळी त्यांनी केला.
इराण हा पूर्वीपेक्षा अधिक कमकुवत झाला आहे. तसेच इस्रायल पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली झाला आहे. हा दावा करत नेतान्याहू यांनी प्रतिज्ञा केली की, या इस्लामिक प्रजासत्ताकाविरुद्धची मोहीम अद्याप संपलेली नाही.





























































