केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पहिल्यांदाच हवाई, रस्ते, रेल्वे आणि जलमार्गाद्वारे मानवी अवयवांच्या वाहतुकीसाठी मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) जारी केली. त्यानुसार हवाई मार्गाने ऑर्गन ट्रान्सपोर्टेशन करताना विमानात विशेष सुविधा दिल्या जातील.
खरं तर जेव्हा अवयव दाता आणि अवयव प्राप्तकर्ता दोघेही एकाच शहरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये असतात, तेव्हा एक जिवंत अवयव वेळेवर हॉस्पिटलमध्ये नेणे आवश्यक असते. त्यासाठी हवाई, रस्ते, रेल्वे वा जल मार्गाच्या वापर करून ऑर्गन ट्रान्सपोर्टेशन केले जाते.
ही अवयव वाहतुकीची प्रक्रिया सुरळीत व्हावी म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एसओपी जारी केली आहे. या निर्णयावर केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले, अवयव वाहतुकीची प्रक्रिया सुव्यवस्थित करून मौल्यवान अवयवांचा वापर वाढवण्यास प्रोत्साहन देणे हा आमचा उद्देश आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे देशभरातील अवयव पुनर्प्राप्ती आणि प्रत्यारोपण संस्थांसाठी गुणवत्ता मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी एक रोडमॅप आहे.
मेट्रोचे काय नियम आहेत
मेट्रोचे सुरक्षा कर्मचाऱयांना अवयव बॉक्स घेऊन जाणाऱया क्लिनिकल टीमसोबत (ते मेट्रो स्टेशनवर चढेपर्यंत) राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मेट्रोचा एक अधिकारी क्लिनिकल टीमला मेट्रोमध्ये घेऊन जाईल आणि सुरक्षा तपासणीमध्ये कोणताही विलंब होऊ नये यासाठी अधिकारी व्यवस्था करतील.
एसओपीनुसार, रुग्णवाहिका आणि इतर वाहनांद्वारे अवयवांची वाहतूक सुलभ करण्यासाठी विशिष्ट प्राधिकरण किंवा एजन्सीच्या आवाहनानुसार ‘ग्रीन कॉरिडॉर’ची व्यवस्था केली जाईल.