
सामना प्रतिनिधी । पणजी
काँग्रेसचा हात सोडून भाजपवासी झालेल्या दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी आपल्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. मतदारसंघातील तरुणांना नोकऱ्या आणि मतदारसंघाच्या विकसासाठी आम्ही काँग्रेस सोडून भाजप मध्ये दाखल झाल्याचा दावा दोन्ही नेत्यांनी केला.
भाजप मध्ये प्रवेश केल्या नंतर प्रथमच सोपटे आणि शिरोडकर पत्रकारांना सामोरे गेले. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर आणि विजमंत्री नीलेश काब्राल उपस्थित होते.
तेंडुलकर म्हणाले, दोन्ही नेते बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे असून तळागाळातील लोकांची त्यांना चांगली जाण आहे.दोघे स्वखुशीने भाजप मध्ये आले असून त्यासाठी कोणतेही आमिष दाखवण्यात आले नाही. शिवाय एक पैसा देखील खर्च करण्यात आला नाही.
सोपटे यांनी काँग्रेसवर जोरदार टिका केली. सोपटे म्हणाले, 17 आमदार निवडून येऊन देखील काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नाही. 3 वेळा संधी मिळून देखील काँग्रेस सत्ता स्थापन करू शकला नाही. काँग्रेस नेत्यांमध्ये एकमत नसल्याने सगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. विरोधात असून देखील मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सहकार्य लाभल्याने मतदारसंघात 32 कोटी रुपयांची कामे सुरु झाली. 103 लोकांना छोट्या मोठ्या नोकऱ्या लावू शकलो. सत्ताधारी पक्षात गेलो तर सरकारी नोकऱ्या देता येतील आणि विकासकामे वेगाने होतील याची खात्री पटल्याने आपण भाजपमध्ये प्रवेश केला.
शिरोडकर यांनी देखील काँग्रेसकडून फारसे काही होत नसल्याने इतर मतदारसंघाबरोबर शिरोडा मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी भाजपमध्ये आल्याचे सांगितले. केंद्रात काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता नसल्याने काँग्रेस सोबत राहून फायदा नसल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.
काँग्रेसने बरखास्त केल्या शिरोडा, मांद्रे समित्या
दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी दगाबाजी करून भाजप मध्ये प्रवेश करताच काँग्रेसने तातडीने हालचाली करत शिरोडा आणि मांद्रे मतदारसंघातील मंडळ समित्या बरखास्त केल्या आहेत. दोन्ही मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते संतप्त असून पुतळे जाळून आपली नाराजी व्यक्त करत आहेत. दोन्ही मतदारसंघात उमेदवार शोधण्याचे काम काँग्रेसने हाती घेतले आहे.

























































