दक्षिण आफ्रिकन महिला प्रथमच फायनलमध्ये

दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने अखेर विश्वचषकाच्या इतिहासात सुवर्णपान जोडले आहे. गुवाहाटीत झालेल्या उपांत्य सामन्यात आफ्रिकन महिलांनी इंग्लंडचा 125 धावांनी दणदणीत पराभव करत प्रथमच महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आफ्रिकेच्या स्टार फलंदाज लॉरा वोलवार्ड्टने 143 चेंडूंवर 169 धावांची भव्य खेळी केली. तिच्या या धडाकेबाज खेळीला मरिझान कॅपने 42 धावांची मौल्यवान साथ दिली. त्यांच्या जोडीने दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 षटकांत 7 बाद 319 धावा असा भक्कम डाव उभारला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव 42.3 षटकांत 194 धावांवर गारद झाला. इंग्लंडकडून सोफी एकलस्टोनने 4/44 अशी झुंजार कामगिरी केली, पण ती निष्फळ ठरली. 320 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातच भीषण झाली. पहिल्या सात चेंडूंमध्येच 3 बाद 1 अशी अवस्था झाली आणि सामना जवळपास तिथेच हरला गेला.