>> दिलीप ठाकूर
अभिनय करतानाच चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकून त्यातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय अशी चित्रपती व्ही. शांताराम, राज कपूर, गुरुदत्त यांच्यापासून बरीच मोठी यशस्वी परंपरा आहे. हिंदीबरोबरच मराठी व अन्य अनेक प्रादेशिक भाषेतील चित्रपटांतूनही ही परंपरा सुरू आहे. तसं हे अवघड काम. कारण कलाकार म्हणून काम करताना आपलं शूटिंग संपलं की, आपण घरी अथवा पार्टीला जायला मोकळे. त्यासह दिग्दर्शन करायचं तर छोटय़ा गोष्टीपासून सहकलाकारापर्यंत आणि गाण्यांपासून कला दिग्दर्शनापर्यंत निवडीचं काम असतं. त्यात चित्रपटाचं पोस्टर डिझाइनही आलंच. धनुष आता याच कामाकडे गंभीरपणे पाहतोय.
आजच्या ग्लोबल युगात चित्रपट संस्कृतीचा विचार करताना ‘भाषेची सीमा’ राहिलेली नाही आणि पॅन इंडिया चित्रपट निर्मितीत एका भाषेतील चित्रपट अन्य अनेक भाषेत डब होऊन अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचताहेत. धनुषने चित्रपट दिग्दर्शनावर ‘फोकस’ करण्याचा काळ त्याच्या हिताचा आहे. त्याच्या दिग्दर्शनातील तामिळ भाषेतील चित्रपट हिंदीसह अन्य भाषेत डब होऊन येणारच आहेत. त्याने 2017 साली पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकलं तेव्हा स्वतकडे चक्क छोटीशीच भूमिका घेतली. या तमीळ चित्रपटाचे नाव `Papaandi’ असं होतं आणि दक्षिणेकडील राज किरण या अभिनेत्याची चक्क तिहेरी भूमिका होती. रेवती नायिका होती. पहिल्या दिग्दर्शनानंतर धनुषने अभिनयाकडे लक्ष केंद्रित केलं. तोपर्यंत तो आनंद एल. राय दिग्दर्शित ‘रांझना’पासून हिंदीत आला, पण रमला नाही. त्यापेक्षा त्याने तामिळ भाषेतील चित्रपटांना जास्त प्राधान्य दिलं.
आतापर्यंत त्याने 54 चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत पण त्याचं वय आहे 41. नुकताच म्हणजे 28 जुलैला त्याचा वाढदिवस झाला. (त्याचा जन्म 1983 चा) त्याचा पहिला चित्रपट ‘Thulluvadho llamai’ त्याच्या वडिलांनी म्हणजेच कास्तुरी रागा यांनी दिग्दर्शित केला होता. म्हणजेच वडिलांकडून धनुषकडे चित्रपट दिग्दर्शनाचे गुण आलेत असं म्हणायला हवं. धनुषने दिग्दर्शित केलेला दुसरा तामिळ चित्रपट ‘रायान’ नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात तो स्वत आणि एस. जे. सूर्या, प्रकाश राज, कालिदास जयराम इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याने दिग्दर्शित केलेला तिसरा तामिळ चित्रपट रोमॅण्टिक कॉमेडी आहे. त्याचं नाव आहे `Nilavuku en mel errnadi koban’ असून या चित्रपटाच्या निर्मिती व दिग्दर्शनासह लेखनही त्याचं आहे. त्यात त्याचीही भूमिका आहे. तात्पर्य, आता धनुषचा फोकस स्पष्ट आहे. नायकाच्या भूमिकेसह जसं शक्य होईल तसं दिग्दर्शनही करायचं.
दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट निर्मितीत वेळ, बजेट, प्रदर्शन यांचं काटेकोर नियोजन होत असल्यानेच चित्रपट व्यवस्थित पडद्यावर येतात. जे रसिकांना आवडतात ते हिट होतात. बाकीचे फक्त संख्या वाढवतात, हे वर्षानुवर्षं सुरू आहे.
कमल हसनने एकीकडे अन्य दिग्दर्शकांकडील चित्रपटांत विविध गेटअपमध्ये भूमिका सुरू ठेवत आपली दिग्दर्शनाची हौसमौज भागवली. ते करताना स्वतला अतिशय फिटही ठेवल्या. धनुषने त्याचाच आदर्श ठेवला तर तो नक्कीच यशस्वी ठरेल.
>> [email protected]
(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)