सलमान खानसोबत रोमान्स करणार साऊथची लेडी सूपरस्टार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा, ही चित्रपट निर्माते वामशी पैडिपल्ली यांच्या आगामी चित्रपटात अभिनेता सलमान खानसोबत झळकणार आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुधवारी केली. या ॲक्शन-ड्रामा चित्रपटाची निर्मिती निर्माते दिल राजू यांच्या ‘श्री व्यंकटेश्वरा क्रिएशन्स’ या बॅनरखाली करण्यात येत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला या महिन्याच्या अखेरीस सुरुवात होणार आहे. नयनताराची ओळख ही लेडी सूपरस्टार अशी आहे.

नयनतारा हे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत नावाजलेल्या नावांपैकी एक आहे. तिने अनेक तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तिच्या काही गाजलेल्या चित्रपटांमध्ये ‘चंद्रमुखी’, ‘गजनी’, ‘बिल्ला’, ‘राजा राणी’, ‘नानम राउडी धान’ आणि ‘विश्वासम’ यांचा समावेश होतो. तिने २०२३ मधील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘जवान’ द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने शाहरुख खानसोबत काम केले होते. जागतिक बॉक्स ऑफिसवर १,००० कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ॲटली यांनी केले होते.

पैडिपल्ली हे ‘येवडू’, ‘ऊपिरी’, ‘महर्षी’ आणि ‘वारिसू’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ओळखले जातात. सलमान खान आपल्याला आगामी चित्रपट ‘मातृभूमी’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे पूर्वीचे शीर्षक ‘बॅटल ऑफ गलवान’ असे होते. हा चित्रपट भारत आणि चीन यांच्यात २०२० मध्ये झालेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित आहे. याचे दिग्दर्शन ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’ या चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेल्या अपूर्व लाखिया यांनी केले आहे.