
‘पब्लिक स्पिपिंग’ या विषयामध्ये जितके ‘स्पिकिंग’ महत्त्वाचे आहे तितकेच ‘पब्लिक’सुद्धा महत्त्वाचे आहे. संभाषण कौशल्य शिकताना बरेचदा आपण वेगवेगळय़ा पद्धती, व्यायाम यांचा अभ्यास करत असतो. परंतु शिकलेला अभ्यास जोपर्यंत चारचौघांसमोर जाऊन मांडणार नाही, तोपर्यंत त्यातल्या त्रुटी व त्यातले यश आपल्याला कदापि समजणार नाही.
तुम्हाला बोलायचे कसे हे शिकण्याअगोदर हे निश्चित करता आले पाहिजे की, एखादा विषय मला नेमका कुठे बोलायचा आहे, किती लोकांसमोर तो मांडायचा आहे, माझा ऐकणारा श्रोता कोणत्या पद्धतीचा असेल… इत्यादी.
काही लोकांना बोलण्यासाठी संधी मिळते, तर काही लोकांना ती निर्माण करावी लागते. एखाद्या विषयावर बोलण्यासाठी संधी तेव्हाच मिळते जेव्हा आपण त्यातले तज्ञ असतो. नव्याने संभाषण कौशल्य शिकणाऱयांना मात्र आपले पब्लिक सुरुवातीला आपल्यालाच गोळा करावे लागते. म्हणूनच पहिल्याच संभाषणात थेट मोठय़ा गर्दीला सामोरे न जाता तुम्हाला छोटय़ा छोटय़ा समूहांमधून स्वतःचा आत्मविश्वास वाढवत न्यायला हवा. यासाठी पहिले तुम्ही कुटुंबीयांसोबत बोला. त्यानंतर तुमच्या मित्र-मैत्रिणींसमोर बोला. हळूहळू अनोळखी लोकांसमोर व्यक्त व्हा आणि त्यानंतर प्रचंड जनसमुदायाला सामोरे जा. टप्प्याटप्प्याने गेल्यामुळे आपल्या मनातले असणारे दडपण आणि भीती हळूहळू निघून जाते.
एखाद्या गोष्टीचे अंतिम ध्येय जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही, तोपर्यंत ती गोष्ट सुरू करून किंवा नुसतीच शिकून त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आजकाल माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये तुम्ही ऑनलाइन सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादा फेसबुक लाइव्ह, यूटय़ूब लाइव्ह किंवा इन्स्टाग्राम लाइव्ह करूनसुद्धा लोकांसोबत चर्चा करू शकता. झूम कॉल्स, गुगल मिट यांसारख्या माध्यमांचा वापर करून एक विषय घेऊन त्यावर चर्चासत्र आयोजित करू शकता.
एक उत्तम वक्ता होण्यासाठी जितके बोलणे, शिकणे महत्त्वाचे आहे तितकेच हे ठरवणेदेखील महत्त्वाचे आहे की, शिकल्यानंतर ते सादर कुठे करायचे. तुम्ही हे ठरवायला हवे कधी, कुठे, केव्हा बोलायचे आणि त्यानंतर त्या विषयानुरूप स्वतःची आवश्यक ती तयारी करून निश्चित दिवशी संकल्पाला सिद्धीस न्यायला हवे.
किरण खोत
निवेदक, सूत्रसंचालक





























































